Lalit Patil drug racket : ललितच्या ड्रग्ज रॅकेटमध्ये अ‍ॅड. प्रज्ञा कांबळेचाही सहभाग | पुढारी

Lalit Patil drug racket : ललितच्या ड्रग्ज रॅकेटमध्ये अ‍ॅड. प्रज्ञा कांबळेचाही सहभाग

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ललितच्या ड्रग्ज रॅकेटमध्ये आता त्याची मैत्रीण अ‍ॅड. प्रज्ञा कांबळे हिचाही सहभाग निष्पन्न झाला असून, तिला लवकरच याप्रकरणी अटक करण्यात येणार आहे. ललित पाटील पलायन प्रकरणात सहभागी असलेली प्रज्ञा कांबळे व मैत्रीण अर्चना निकम यांची सोमवारी न्यायालयाने पोलिस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून येरवडा कारागृहात रवानगी केली. पुणे पोलिसांनी प्रज्ञा हिचा ताबा मागितल्यानंतर न्यायालयाने तिच्या प्रॉडक्शन वॉरंटला परवानगी दिली आहे. तिला लवकरच या गुन्ह्यात अटक करण्यात येणार आहे.

बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये आता प्रज्ञाला सहआरोपी करण्यात आले आहे. अमली पदार्थ विक्रीतून आलेले, पैसे त्यातून खरेदी केलेली महागडी गाडी, गाडीचे हप्ते भूषण पाटील याच्या बँक खात्यातून जात होते. तसेच नाशिक येथील शिंदे गावात सुरू करण्यात आलेला ड्रग्ज कारखाना याबाबत प्रज्ञा हिला माहिती होती.

तरीदेखील तिने याबाबत कुठेही वाच्यता केली नाही. तिथे काम करणारा आरोपी जिशान शेख हा सर्व कारखान्यातील उत्पादनाची जबाबदारी सांभाळत होता. तो वारंवार प्रज्ञा हिच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, तिचा गुन्ह्यातील सहभाग महत्त्त्वाचा असल्याने तिच्या अटकेसाठी प्रॉडक्शन वारंट गुन्हे शाखेच्या वतीने न्यायालयासमोर सादर करण्यात आले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. सी. बिराजदार यांनी प्रज्ञाला दुसर्‍या गुन्ह्यात अटक करण्यास परवानगी दिली.

प्रज्ञाला अश्रू अनावर

सुरुवातीस आपला गुन्ह्याशी काहीही संबंध नाही, असा आविर्भाव दाखविणारी प्रज्ञा न्यायालयात रडताना पाहायला मिळाली. ललित पलायन प्रकरणात तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर आपल्याला जामीन मिळणार, ही आशा तिला असतानाच पोलिसांनी तिचा सहभाग ड्रग्ज प्रकरणात आढळल्याने तिचे या गुन्ह्यात प्रॉडक्शन मागितल्याने तिला हे समजताच अश्रू अनावर झाले. याप्रकरणात पोलिसांची 100 हून अधिक जणांची चौकशी केली असून, त्यातील काही जणांना अटक केली आहे.

दोघांना न्यायालयीन कोठडी

ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील व ड्रग्ज तस्करीमधील आरोपी अभिषेक बलकवडे या दोघांना ड्रग्ज बाळगल्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यांची सोमवारी पोलिस कोठडी संपल्याने पोलिसांनी न्यायालयासमोर दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याची मागणी केली.

आरोपींना सोडण्याचे आश्वासन

ड्रग्स बनविण्याचे मुख्य काम सध्या पोलिसांच्या कोठडीत असलेला अरविंदकुमार लोहारे करीत होता. 2020 पासून लोहारे हा येरवडा कारागृहात होता. नाशिक येथील इंदिरानगर येथील एका प्रकरणात लोहारे आणि हरिश पंत हे आरोपी होते. त्या वेळी ड्रग्ज तस्कर ललित पाटील आणि अ‍ॅड. प्रज्ञा कांबळे यांनी लोहारे आणि इतर आरोपींना जामीन मिळून देण्याचे आश्वासन दिले होते.

हेही वाचा

सुरक्षानगरमध्ये सना पटवेगर पैठणीच्या विजेत्या

Lalit Patil : ललित पाटील सुरुवातीपासूनच करीत होता ‘ड्रामा’

पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्तारुंदीकरण सुकर

Back to top button