अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : नऊ लाख रुपये रोकड असलेली बॅग मोटरसायकलवरील चोराने पळवून नेल्याच्या गुन्ह्यात फिर्याद देणाराच आरोपी निघाला. कोतवाली पोलिसांनी सीसीटीव्ही व तांत्रिक बाबींचा तपास करून या गुन्ह्याचा छडा लावला असून, नऊ लाख रुपयांची रोकड आरोपीकडून जप्त केली. शरद रावसाहेब पवार (वय 40, रा. नेप्ती फाटा, अहमदनगर) असे त्याचे नाव आहे.
पुणे येथे वास्तव्यास असलेले हरिभाऊ बंडूजी शिंदे यांच्याकडे पवार काम करीत होता. शिंदे यांनी कांदा चाळीवर काम करणार्या मजुरांना देण्यासाठी पवारला नऊ लाख रुपये दिले होते. ते घेऊन पवार आयुर्वेदिक कॉलेज रस्त्याने सोमवारी (दि.14) जात होता.
मोटरसायकलवरून आलेल्या चोराने त्याच्याकडील पैशांची बॅग पळवून नेल्याची फिर्याद त्याने कोतवाली पोलिसात दिली होती. पोलिस निरीक्षक यादव चंद्रशेखर यादव यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच नागरिकांकडे चौकशी केली. मात्र, अशी कोणतीही चोरीची घटना घडली नसल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे पवारबाबतच संशय बळावला. त्याची कसून चौकशी केली असता मालकाने दिलेली रोकड नातेवाइकाकडे लपवून ठेवल्याची कबुली त्याने दिली. पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाटील तपास करीत आहेत.
पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रवींद्र पिंगळे, उपनिरीक्षक प्रवीण पाटील, अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, सलीम शेख, रियाज इनामदार, अभय कदम, संदीप थोरात, अमोल गाढे, कैलास शिरसाठ, सागर मिसाळ, सोमनाथ राऊत, सुजय हिवाळे, अतुल काजळे, याकुब सय्यद यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हेही वाचा