अहमदनगर जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यात साडेपाच वर्षांत 10 मृत्यू | पुढारी

अहमदनगर जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यात साडेपाच वर्षांत 10 मृत्यू

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : गेल्या साडेपाच वर्षांत वन्यप्राण्यांनी जिल्ह्यातील 138 व्यक्तींवर हल्ला केला. त्यात 128 जण जखमी आणि 10 जणांचा मृत्यू झाला. यामधील नऊ व्यक्तींचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाला असून एकाचा मृत्यू तरसाच्या हल्ल्यात झाला. या व्यक्तींच्या कुटुंबांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 15 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. या आर्थिक मदतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या वर्षी 20 लाखांची मदत दिली जात होती. यापुढे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास 25 लाखांची मदत शासनाने जाहीर केली आहे.

गेल्या दीड दोन दशकांपासून वनक्षेत्र कमी होत आहे. त्यामुळे वन्यप्राणी खाद्य आणि पाण्याच्या शोधात मानवी वस्तीच्या आसपास अधिवास करू लागले आहेत. यामध्ये सर्वाधिक बिबट्यांचा समावेश आहे. सध्या बिबट्याचे वास्तव मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शेतशिवार आणि गावांतील शेळ्या, मेढ्या, कुत्रे यांचा फडशा पाडण्याचे काम बिबट्यांकडून सुरू आहे. शिकारीच्या शोधात फिरताना बिबट्यांचे व्यक्ती आणि लहान मुलांवर हल्ले वाढले आहेत.

गेल्या साडेपाच वर्षांत 138 व्यक्तींवर वन्यप्राण्यांनी हल्ले केले. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे. एका ठिकाणी तरसाकडून, तर इतर नऊ व्यक्तींचा बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. एका ठिकाणी 2019-20 या वर्षात बिबट्यांच्या हल्ल्यात चार जण मृत्युमुखी पडले. गेल्या दीड वर्षात 53 व्यक्तींवर बिबट्यांचे हल्ले झाले. या हल्ल्यात काही गंभीर तर काही किरकोळ जखमी झाले. यामध्ये एकही मृत्यूची नोंद नाही.

मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला 15 लाख रुपये आर्थिक मदत दिली गेली आहे. 128 जखमी व्यक्तींनादेखील आर्थिक मदत देण्यात आली आहे. गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला सव्वालाख रुपये तर कायमचे अपंगत्व आल्यास 5 लाख रुपये, किरकोळ जखमी व्यक्तीला 20 हजार रुपयांची मदत केली जात आहे. दरम्यान, गेल्या वर्षीं हल्ल्यात मरण पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला 20 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर झालेली आहे. दरम्यान, गेल्या दीड वर्षांत बिबट्यांच्या हल्ल्यात एकाचाही मृत्यू न झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

बिबटे रात्रभर फिरत असल्यामुळे रात्रीची दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री शेतावर जाण्यास आणि इतरत्र फिरण्यास शेतकरी घाबरू लागले आहेत. जिल्ह्यात दररोज कुठे ना कुठे बिबट्याच्या हल्ल्याची नोंद होत आहे. त्यामुळे शेतमालांच्या चोरीस देखील काही प्रमाणात लगाम बसला आहे. बिबट्यांचा वावर वाढल्यास वनविभागाच्या वतीने त्यांची धरपकड करून दुसरीकडे सोडले जात आहे. त्यामुळे एका ठिकाणाची भीती दुसरीकडे वाढत आहे.

आता 25 लाख रुपये नुकसानभरपाई

वन्य प्राण्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला 25 लाख रुपये आर्थिक मदत राज्य शासनाने जाहीर केली आहे. कायमचे अपंगत्व आल्यास साडेसात लाख रुपये, गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीस 5 लाख रुपये तर किरकोळ जखमी झालेल्या व्यक्तीला 50 हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळणार असल्याचे अहमदनगर उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांनी सांगितले.

हेही वाचा

हिंसाचारग्रस्त मणिपुरात २५ वर्षांनंतर हिंदी चित्रपट!

अहमदनगर जिल्ह्यात नोकरदार सॉफ्ट टार्गेट! सात महिन्यांत 54 हल्ले

समतादूतांचा लाँग मार्च ; प्रलंबित मागण्यांसाठी उतरले रस्त्यावर

Back to top button