

संगमनेर शहर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : तालुक्याच्या पठार भागातील पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर ट्रकला कारने पाठीमागून दिलेल्या धडकेत एकजण ठार झाला. आंबीखालसा फाटा परीसरात ही दुर्घटना शनिवार (दि. 3 जुन) रोजी रात्री साडेदहा वाजेच्या दरम्यान घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, ट्रक (क्रमांक आरजे- 14, जीके 2050) हा पुण्याकडून नाशिकच्या दिशेने चालला होता.
शनिवारी रात्री तो साडेदहा ते अकरा वाजेच्या दरम्यान आंबीखालसा फाटा परिसरात आला असता, त्याच दरम्यान पाठीमागून भरधाव वेगाने आलेली कार (एमएच 17, एसी 197) वरील चालक आनंद सुनील भाटेवरा यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात आनंद सुनील भाटेवरा (वय 23, रा. कोल्हार तालुका, राहाता) हा गंभीर जखमी झाला.
दरम्यान, या दुर्घटनेची माहिती समजताच आजुबाजूच्या नागरिकांनी धाव घेत भाटेवरा यास खासगी रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालय संगमनेर येथे पाठवून दिले. वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी करत त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी वैद्यकीय अधिकार्यांच्या खबरीवरून घारगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार राजू खेडकर हे करीत आहे. या दुर्घटनेनंतर कोल्हार येथे शोककळा पसरली आहे.
हेही वाचा