नाशिक जिल्ह्याला टंचाईच्या झळा, पाच धरण समूहांमध्ये ३० टक्क्यांहून कमी पाणीसाठा | पुढारी

नाशिक जिल्ह्याला टंचाईच्या झळा, पाच धरण समूहांमध्ये ३० टक्क्यांहून कमी पाणीसाठा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जूनच्या प्रारंभी जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली असून, प्रमुख सहापैकी तब्बल पाच धरण समूहांमध्ये ३० टक्क्यांहून कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. नाशिकची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरण समूहातील चारही प्रकल्प मिळून अवघा २७ टक्के साठा शिल्लक आहे. पाण्याची उपलब्धता बघता सामान्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.

अंदमान-निकोबार बेटांमध्ये हजेरी लावणाऱ्या मान्सूनचा पुढील प्रवास योग्य दिशेने सुरू आहे. येत्या १५ तारखेपर्यंत राज्यात सर्वदूर मान्सून सक्रिय होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यंदाच्या वर्षी अल निनोचे संकट असले तरी सरासरीच्या ९६ टक्के मान्सून होईल, असेही भाकीत वर्तविले जात आहे. पण एकीकडे मान्सूनसाठीची ही काहीशी चांगली वर्दी असताना जिल्ह्यातील धरणांनी जूनच्या प्रारंभीच तळ गाठला आहे. त्यामुळे टंचाईच्या झळा अधिक जाणवत आहे.

जिल्ह्यात प्रमुख ६ धरण समूह असून, त्यापैकी गंगापूर समूहातील चारही प्रकल्प मिळून २७८० दलघफू म्हणजेच २७ टक्के उपयुक्त साठा शिल्लक आहे. याशिवाय पालखेड व ओझरखेड धरण समूहात अनुक्रमे १७ व २१ टक्के साठा आहे. दारणा समूहाची स्थिती थोडीशी चांगली असून, त्यात ३४ टक्क्यांच्या आसपास पाणी आहे. तसेच गिरणा खोऱ्यातील चणकापूर समूहात २५ टक्के व पुनद समूहात अवघे २७ टक्के उपयुक्त साठा शिल्लक आहे. हवामान खात्याने मान्सून चांगला बरसणार असल्याचे भाकीत केले असले तरी दोन पावसांमध्ये १० ते १५ दिवसांचा खंड पडल्यास जिल्ह्यात पाण्याचे संकट अधिक गडद हाेऊ शकते. त्यामुळे येत्या काळात पाण्याचे संकट टाळायचे असल्यास आतापासून पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे.

धरण समूहनिहाय साठा

धरण समूहसाठा    (दलघफू) टक्केवारी

गंगापूर                     2780 27

दारणा                      6355 34

पालखेड                    1434 17

ओझरखेड                  674 21

चणकापूर                  5751 21

पुनद                        451 27

एकूण                      17474 27

हेही वाचा :

Back to top button