

धायरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सिंहगड रोडवर धायरी फाटा, वडगाव खुर्द येथे वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी स्व. आमदार रमेशभाऊ वांजळे उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. या ठिकाणी बाजारपेठ असल्याने नागरिकांची नेहमी वर्दळ असते. यामुळे उड्डाणपुलाखाली दुचाकींच्या पार्किंगची व्यवस्था केली आहे. मात्र, या पार्किंगचा उपयोग बाजारात येणार्या नागरिकांऐवजी नोकरदारांना होत असून, त्यांच्या दुचाकी या ठिकाणी तासन् तास उभ्या केल्या जात आहेत. यामुळे वाहनांचे पार्किंग करायचे तरी कुठे?
असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.
या उड्डाणपुलाखाली नोकरदारांच्या दुचाकी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ते कामावरून येईपर्यंत पार्क केल्या जात आहेत. यामुळे येथील पार्किंग पहाटेपासून रात्रीपर्यंत तडुंब भरलेले असते. परिणामी, बाजारपेठेत खरेदीसाठी येणार्या नागरिकांच्या दुचाकी उभ्या करण्यासाठी जागाच शिल्लक राहत नाही. त्यामुळे नागरिक आपली वाहने रस्त्यावरच उभी करत असल्याने धायरी फाटा, वडगाव खुर्द परिसरात दररोजच वाहतूक कोंडी होत आहे.
वाहतूक पोलिस कारवाई करीत असल्याने वाहनचालक हैराण झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर बाजारात येणार्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पार्किंगमध्ये दिवसभर व रात्रभर उभ्या करण्यात येणार्या दुचाकींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, या पर्किंगमध्ये वाहने उभी करण्यासाठी जागा शिल्लक राहत नसल्यामुळे त्रस्त झालेल्या व्यावसायिकांनी आपापली दुकाने बंद करून प्रशासनाचा निषेध केला.
उड्डाणपुलाखालील पार्किंग हे बाजारात येणारे नागरिक, व्यावसायिक, दवाखान्यात येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांसाठी केले आहे. नोकरदारांनी या ठिकाणी दिवसभर किंवा रात्रभर वाहने उभे करू नयेत; अन्यथा कारवाई करण्यात येईल.
– पांडुरंग वाघमारे,
सहायक पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, सिंहगड रोडबाजारात खरेदीसाठी येणार्या नागरिकांची वाहने उभी करण्यासाठी दिवसभर या पार्किंगमध्ये जागाच शिल्लक नसते. यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून, प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे.
-राजाभाऊ कांबळे,
सामाजिक कार्यकर्ते