पाथर्डी : दारू अड्ड्यांवर जाऊन दिल्या नोटिसा; सरपंच आठरे यांचा पुढाकार

पाथर्डी : दारू अड्ड्यांवर जाऊन दिल्या नोटिसा; सरपंच आठरे यांचा पुढाकार

पाथर्डी तालुका(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : गावातील अवैधपणे विकली जाणारी दारू बंद होण्यासाठी जाटदेवळेच्या सरपंच सविता आठरे यांनी पुढाकार घेतला आहे. ग्रामपंचायतीमार्फत गावात सहा ठिकाणी होणार्‍या अवैध दारू विक्रेत्यांना यापुढे गावात दारू विकता येणार नाही, अशा नोटिसा बजावल्या आहेत. पाच हजाराचा दंड ठोठावून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले जाईल, असा ठराव ग्रामस्थ, ग्रामपंचायत व महिलांनी घेतला आहे.

पाथर्डी तालुक्यात डोंगराळ भागात असलेले जाटदेवळे हे गाव तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असून, बीड जिल्ह्याची हद्द या गावाला लागून आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारू विक्री होते. या प्रकाराकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याने सरपंच सविता आठरे यांनी दारूबंदीसाठी महिलांची समिती स्थापन केली आहे. गावातून कायमस्वरूपी दारू हद्दपार होण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.

यावेळी कविता दारकुंडे, शांता पवार, परागा पवार, आशा शिंदे, मीना बहिरवाळ, संगीता रहाटे, मीरा पवार, आशा पवार, मनीषा नांगरे, मनीषा खेडकर, पारूताई खेडकर, अंजली तिरखुंडे, संगीता तरखुंडे, ताई आठरे, सोनाली आठरे, सावित्रा आठरे, सोनाली पवार, आरती बहिरवाळ, मनीषा आठरे, संगीता आठरे, शहाबाई पवार, जनाबाई पवार आदी महिला या दारूबंदीच्या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत.

अवैध दारू विक्रेत्यांना सरपंच आठरे, ग्रामपंचायत कर्मचारी कृष्णा पवार, महादेव भोसले, संतोष पवार व दारूबंदी समिती अध्यक्ष आशा नन्नावरे, उपाध्यक्ष आशा पवार, तसेच गावातील महिलांनी सहा दारू विक्रेत्यांच्या अड्ड्यांवर जाऊन नोटिसा बजावल्या आहेत. दारूविक्री केल्यास पाच हजार रूपये दंड वसूल करून पोलिसांच्या स्वाधीन केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, सर्व दारू विक्रेत्यांकडून दारू विक्री करणार नाही, अशी ग्रामपंचायतीच्या लेटरपॅडवर सही घेतली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news