जयसिंगपूर : गेल्या काही दिवसापासून धरण व पाणलोट क्षेत्रासह सर्वत्र होत असलेल्या पावसामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा, वारणा, पंचगंगा व दुधगंगा या ४ नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तर कृष्णा नदीच्या पाणी पातळीत तब्बल दीड फुटाने वाढ झाली आहे. त्यामुळे राजापूर बंधार्यातून ७६ हजार ७५० क्युसेक्सने पाणी कर्नाटक राज्यात विसर्ग केले जात आहे. त्याचबरोबर वारणा, पंचगंगा व दुधगंगा नदींच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे.
कोयना, चांदोली, राधानगरी, काळम्मवाडी यासह अन्य धरण व पाणलोट क्षेत्रासह सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत नद्या दुथड्या भरून वाहत आहेत. परिणामी, तालुक्यातील सर्वच बंधारे पाण्याखाली गेले आहेत. शनिवारी कृष्णा, वारणेचे पाणी स्थिर राहिले होते. मात्र, कृष्णा नदीच्या पाणी पातळीत तब्बल दीड फुटांनी वाढ झाली आहे. कृष्णा नदीत उदगांव येथे १९.०१ इतकी लेव्हल असून ४२ हजार १८० क्युसेक्सने पाणी राजापूर बंधार्याकडे जात आहे.
तर राजापूर बंधार्यात ३१.०६ फुटाची लेव्हल असून हे पाणी ७६ हजार ७५० क्युसेक्सने कर्नाटकात जात आहे. तर पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. त्याचबरोबर दुधगंगा नदीचीही पाणी पातळी वाढल्याने सर्व आवक कृष्णा नदीत येऊन हिप्परगी व अलमट्टी धरणाकडे जात आहे. जोरदार पावसामुळे शिरोळ तालुक्यातील पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा :