नांदूरपठार-कळस अंतर आता 5 कि.मी ! | पुढारी

नांदूरपठार-कळस अंतर आता 5 कि.मी !

पारनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्य प्राप्तीपासून कळस ते नांदूरपठार अंतर कमी करण्यासाठी आमदार नीलेश लंके यांना वन विभागाकडून रस्त्यासाठी परवानगी मिळविण्यात यश आले आहे. हे अंतर आता 25 किलोमीटरवरून 5 किलोमीटर होणार आहे.
नांंदूरपठार व कळस गावांमध्ये वन विभागाची हद्द असून, गावे शेजारी असूनही रस्त्याअभावी या दोन्ही गावांमधील नागरिकांना पुणे जिल्हयातील बेल्हा मार्गे 25 किलोमीटरचा प्रवास करून जावे लागत होते. दोन्ही गावांमध्ये केवळ पाच किलोमीटर अंतर असतानाही केवळ वन विभागाच्या परवानगीअभावी ग्रामस्थांना हा त्रास सहन करावा लागत असे.

दोन्ही गावांच्या ग्रामस्थांनी यासंदर्भात आमदार नीलेश लंके यांच्याकडे मागणी केल्यानंतर आ. लंके यांनी त्याबाबत वन विभागाच्या नगर येथील कार्यालयाशी संपर्क करून दोन्ही गावांना स्वातंत्र्य प्राप्तीपासून वन विभागाच्या परवानगी अभावी ग्रामस्थांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली.

आमदार लंके यांच्या पाठपुराव्याची दखल घेउन उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांनी कळस हददीतील गट नंबर 809 मधील जमिनीतून 6 मीटर लांब व 1 हजार 600 मीटर रुंद रस्त्यासाठी 96 आर जमीन वळतीकरणासाठी मंजूर केली. वनक्षेत्राचा वैधानिक दर्जात कोणताही बदल न करता सदरचे क्षेत्र हे राखीव वन म्हणूनच राहील, ही अट त्यात घालण्यात आली आहे. एक वर्षाच्या आत हे काम पूर्ण करण्याबाबत बंधन घालण्यात आले आहे.

हेही वाचा

विकास निधीत पुण्याचे आमदार मालामाल

शिरोळ : कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ; ७६ हजार ७५० क्युसेक्सने पाणी कर्नाटकात

गडहिंग्लज पूर्व भागातील गावे संपर्कहीन

Back to top button