Nagar News : जिल्ह्यातील बससेवा झाली पूर्ववत

Nagar News : जिल्ह्यातील बससेवा झाली पूर्ववत

नगर : पुढारी वृत्तसेवा :  मराठा आंदोलन मागे घेताच शुक्रवारपासून जिल्ह्यातील बससेवा पूर्ववत झाली आहे. दरम्यान, आरक्षणाच्या आंदोलनामुळे तीन दिवस एसटी महामंडळाची बससेवा ठप्प होती. या तीन दिवसांत 4 हजार 772 फेर्‍या रद्द झाल्या. त्यामुळे 1 कोटी 23 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. आरक्षणामुळे राज्यभरात मराठा आंदोलन सुरु होते. या काळात आंदोलकांनी एसटीला टार्गेट केल्याने खबरदारी म्हणून बससेवा बंद करण्याचा निर्णय अहमदनगर विभागाने घेतला. मंगळवारी 2 हजार 299 पैकी 1 हजार 352 फेर्‍या रद्द करण्यात आल्या.

या दिवशी एसटी महामंडळाच्या नगर विभागाचे 31 लाख 87 हजार 860 रुपयांचे नुकसान झाले.
बुधवारीही बससेवा बंदच ठेवावी लागली. त्यादिवशी 1 हजार 710 बसफेर्‍या रद्द करण्यात आल्याने महामंडळाला तब्बल 45 लाख 50 हजार 685 रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. गुरुवारी बससेवा पूर्ववत सुरु होईल अशी अपेक्षा होती. मात्र, प्रवाशांची सुरक्षा आणि बसचे नुकसान होईल, या भीतीपोटी अहमदनगर विभागाने बससेवा बंद ठेवली.

मात्र, श्रीगोंदा, पारनेर व अकोले आगारातील बससेवा काही प्रमाणात सुरु होत्या. उर्वरित तारकपूरसह आठ आगारातील बससेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. गुरुवारी सायंकाळी सहा वाजेपर्यत 1 हजार 791 बसफेर्‍या रद्द केल्या होत्या. त्यामुळे बससेवा ठप्पमुळे अहमदनगर विभागाचे 45लाख 79 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तीन दिवस बससेवा ठप्प असल्यामुळे महामंडळाचे एकूण 1 कोटी 23 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शुक्रवारी बससेवा सुरळीत झाली.

तारकपूर आगाराला 30 लाखांचा फटका

नगर येथील तारकपूर आगारात माळीवाडा, तारकपूर व स्वस्तिक या तीन बसस्थानकांतून दररोज 75 बसच्या जवळपास तीनशे फेर्‍या होत आहेत. या तीनही बसस्थानकांतून धावणार्‍या बसच्या माध्यमातून दररोज जवळपास 8 ते 12 लाख उत्पन्न मिळते. आंदोलनामुळे या आगाराची बससेवा गेल्या तीन दिवसांपासून ठप्प आहे. तीन दिवसांत जवळपास 30 लाखांचे उत्पन्न बुडाले आहे.

वाहक- चालकांना शिवभोजनचा आधार

आंदोलनामुळे बससेवा ठप्प मिरज, बोईसर, अंबाजोगाई, सोलापूर, करमाळा, शहादा व आष्टी या आगारांच्या बस गेल्या तीन दिवसांपासून येथे अडकून पडल्या आहेत. सेवा बजावत असताना फक्त दोनशे रुपये जवळ बाळगण्याची सक्ती होती. त्यामुळे पैसे जवळ नसल्यामुळे या कर्मचार्‍यांना शासनाच्या शिवभोजनचा आधार घ्यावा लागली. थंडीच्या दिवसांत बेहाल झाल्याचेही या कर्मचार्‍यांनी सांगितले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news