
नगर : पुढारी वृत्तसेवा
मंकीपॉक्स आजाराबाबत कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत अद्यापि शासनाकडून कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. सूचना उपलब्ध झाल्यास तत्काळ अंमलबजावणी केली जाईल. तोपर्यंत खबरदारी म्हणून शिर्डी विमानतळावर उतरणार्या प्रवाशांची आरोग्य तपासणी सुरू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोना संसर्गाने कहर केला आहे.
या संसर्गाने जिल्ह्यातील जवळपास चार लाख जनता बाधित झाली आहे. दुसरी लाट जीवघेणी ठरली असून, आतापर्यंत कोरोनाने बारा हजार जण दगावले आहेत. गेल्या दोन महिन्यांपूर्वी कोरोनाचे निर्बंध उठविण्यात आले. ते उठविल्यामुळे संसर्ग वाढेल अशी भीती होती. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून बाधितांची संख्या अत्यल्प आढळत आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून परदेशात मंकीपॉक्स या संसर्गजन्य आजाराने डोके वर काढले आहे. कोरोना जात नाही तोच, मंकीपॉक्सच्या चर्चेने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
शासनाने अद्याप कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. आजाराचे प्राथमिक लक्षणे आढळल्यास तत्काळ उपचार करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत. शिर्डीत देशभरातून प्रवाशी येत आहेत. खबरदारी म्हणून प्रवाशांची आरोग्य तपासणी सुरू केली जात आहे.
डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी.