जामखेड(अहमदनगर) : तालुक्यात गेल्या तीन महिन्यापासून पावसाने ओढ दिल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील सात गावांमध्ये विहीर अधिग्रहणाचे काम सुरू आहेत. तर, पोतेवाडी, जवळके गावांना टँकरचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. तालुक्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने दुष्काळाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
यामुळे नवीन सहा गावांना प्रस्तावित विहीर अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यातच हळगाव येथे टँकरचा प्रस्तावित आहे. यामुळे दुष्काळाची दाहकता वाढल्याचे दिसून येते. गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. त्यातच खरीपाचे पिके वाया गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज असून, तालुका दुष्काळाच्या झळा लागायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी शेतकर्यांनी केली.
तालुक्यामध्ये गेल्या तीन महिन्यात पावसाचा एक थेंबही पडलेला नाही. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. खरीप हंगामही वाया गेला आहे. पेरणीसाठी घेतलेले कर्ज आता कसे परत करायचे?, असा प्रश्न आता शेतकर्यांसमरो उभा आहे. गेल्या तीन महिन्यापासून पावासाचा मोठा खंड पडल्याने दुष्काळाची परिस्थिती गंभीर बनली आहे. शेतातील उभी पिके जळून गेल्याने शेतकरी हवालदिल आहे. यामुळे सरकारने चारा छावण्या, पिण्याचे टँकर सुरू करण्याची मागणी शेतकर्यांमधून होत आहे.
तालुक्यातील हळगाव, पिंपरखेड, आरणगावसह अन्य गावांमध्ये लिंबू फळबाग असून, त्याही पाण्याअभावी माना टाकू लागल्या आहेत. त्यामुळे बागायत शेतकरीही आता आर्थिक विवंचनेत अडकला आहे. शासनाने तातडीने उपाय योजना करून अनुदान देण्याच्या मागणी हा शेतकरी करत आहे. आर्थिक उलाढाल करणारे खरीप पिकही पावसाअभावी जळून गेल्याने शेतकर्यांचे पेरणीसह मशागतीचे पैसे वाया गेले.
सध्या दुष्काळग्रस्त परिस्थिती असून, या अशा परिस्थितीत शेतकरी व कष्टकरी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी प्रयत्न करतोय. परंतु, महावितरणकडून करण्यात येणार्या भारनियमनामुळे त्यांचे केेलेले नियोजन कोलमडत आहे. यामुळे भारनियमन न करता अखंडित वीजपुरवठा करण्याची मागणीही शेतकरी करत आहे.
रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यातील प्रत्येक गावात सिंचन विहिरी मंजूर असल्याने शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यामुळे अल्पभूधारक शेतकर्यांचे जिरायत क्षेत्र बागायत होण्यास मदत होणार आहे. सिंचन विहिरीचे चार लाखांचे अनुदान मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहेत.
तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती असून, यासाठी शासनाने शेतकर्यांचे गोठाशेड, विहिरीचे कामे प्रस्तावित आहेत, तर काहींचे पावसाळ्यामुळे कामे थांबवली होती. त्या सर्व शेतकर्यांनी मस्टर मागणी करावी, असे आवाहन गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले.
हेही वाचा