संगमनेर शहर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पावसाने पाठ फिरवल्याने उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील पिके हातची गेली आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे सरकारने तातडीने निळवंडे धरणातून कालव्यांद्वारे पाणी सोडावे, अशी मागणी आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. निळवंडे कालव्यांमधून पाणी सोडण्याबाबत आग्रही मागणी करताना आमदार थोरात म्हणाले की, यावर्षी महाराष्ट्रात दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अत्यंत कमी पावसामुळे खरीप पेरण्या पूर्णपणे वाया गेल्या आहेत. यामुळे ग्रामीण भाग उध्वस्त झाला आहे.
अशा दुष्काळी परिस्थितीत सरकारने काळजी म्हणून बैठका घेऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांचा चार्याचा प्रश्न, रोजगार याबाबत तातडीने निर्णय घेऊन राज्यातील जनतेला दिलासा दिला पाहिजे. मात्र असे काहीही होताना दिसत नाही. निळवंडे धरण हे उत्तर नगर जिल्ह्यातील 182 दुष्काळी गावांकरता निर्माण केले गेले आहे. अनेक अडचणीवर मात करून आपण धरण व कालव्यांची कामे पूर्ण केली आहे. यावर्षी उन्हाळ्यामध्ये भंडारदरा व निळवंडे धरण मिळून दहा टीएमसी पाणी शिल्लक होते. अशावेळी कालव्यांद्वारे दुष्काळी भागात पाणी सोडण्याची मागणी आपण सरकारकडे केली होती.
या मागणीनंतर सरकारने केवळ चाचणीसाठी निळवंडे धरणातून पाणी सोडले. अवघ्या काही दिवसात पाणी सोडणे बंद केले. त्यावेळेस अजून काही दिवस पाणी सुरू राहिले असते तर शेतकर्यांना फायदा झाला असता. आता सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारने तातडीने निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडावे. याचबरोबर उजव्या कालव्याचे अपूर्ण काम त्वरित पूर्ण करून त्या कालव्यातूनही तातडीने पाणी सोडावे, अशी आग्रही मागणी आपण करत आहोत. निळवंडे च्या लाभक्षेत्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने कोणताही विलंब न करता त्वरित पाणी सोडावे. याकरता आम्हाला आंदोलन करण्यास भाग पाडू नये, असा इशाराही या धरणाचे व कालव्यांचे निर्माते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सरकारला दिला आहे.
राज्यासह जिल्ह्यात व तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने अशा दुष्काळी परिस्थितीत शेतकर्यांना पीक विम्याच्या माध्यमातून भरीव मदत करून दिलासा द्यावा, अशी मागणीही माजी महसूल व कृषीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
हेही वाचा