होर्डिंगसाठी झाडांवर कुर्‍हाड; पुण्यातील धक्कादायक प्रकार | पुढारी

होर्डिंगसाठी झाडांवर कुर्‍हाड; पुण्यातील धक्कादायक प्रकार

बाणेर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रात पुन्हा अनधिकृतरित्या झाडे तोडण्यात आली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून वारंवार क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत असे प्रकार घडत आहेत. औंध येथील स्पाईसर चौकात असलेल्या महाराष्ट्र हॉटेलसमोर असलेली तीन व हॉटेलच्या मागे असलेले एक अशी तीन झाडे तोडण्यात आली आहेत. यामध्ये बदामाच्या तीन आणि उंबराच्या एका झाडाचा समावेश आहे. स्पायसर शाळेशेजारी  चौकात होर्डिंग उभारण्यासाठी  झाडे तोडण्यात आल्याचे लक्षात येत आहे.  बुधवारी पहाटे ही झाडे तोडण्यात आली असून, या ठिकाणी महापालिकेकडून फक्त एका झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी परवानगी होती. परंतु प्रत्यक्षात चार झाडे तोडण्यात आल्याचे दिसून येत आहे.
औंध क्षेत्रीय कार्यालयांतर्गत होर्डिंगसाठी वारंवार झाडे तोडली जातात. मागील चार ते पाच महिन्यांत वृक्षतोडीची ही तिसरी घटना आहे. याबाबत ठोस पावले उचलण्याची मागणी पर्यावरणप्रेमी करत आहेत. पहाटे तोडलेली झाडे ही मनसेचे स्थानिक शाखा अध्यक्ष मयूर बोलाडे यांच्या निदर्शनास आली.  याबाबत बोलाडे व  तक्रारदार गणेश कोतवाल यांनी वृक्ष प्राधिकरण खात्याचे वृक्ष निरीक्षक अनिल साबळे यांच्याकडे या घटनेबाबत विचारपूस केली असता त्यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी दिली नसल्याचे सांगितले.
मनसे उपविभाग अध्यक्ष नीलेश जुनवणे यांनी सांगितले की, प्रशासकीय यंत्रणा झाडे तोडल्यावर योग्य ती कारवाई करत नसल्याने वारंवार अशाप्रकारे वृक्षतोड केली जात आहे. होर्डिंगधारक कुणाचाही विचार न करता बेकायदा वृक्षतोड करतात. त्यांना पाठबळ नेमके कुणाचे आहे, याचीही चौकशी झाली पाहिजे. अशी वृक्षतोड करून होर्डिंग उभारण्याला परवानगी देण्यात येऊ नये. संबंधित व्यक्तीवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशाराही  देण्यात आला आहे.  या वेळी मनसेचे विभाग अध्यक्ष विनायक कोतकर,उपविभाग अध्यक्ष नीलेश जुनवणे, सुनील लोयरे, राजू सावळे, मयूर बोलाडे, जितेंद्र कांबळे, अमर अढाळगे, जनाताई रणदिवे आदी उपस्थित होते.
झाडे तोडलेल्या ठिकाणांचा पंचनामा करण्यात आला आहे. संबंधितांना नोटीस बजावण्यात येणार आहे. पाठपुरावा करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
– अनिल साबळे, वृक्ष निरीक्षक, वृक्ष प्राधिकरण विभाग.
हेही वाचा

Back to top button