

नगर, पुढारी वृत्तसेवा: आमच्या बाची पिढी गेली, आम्हीही सत्तरी गाठली, पोरासोरांची लग्न झाली, तरीही हंडाभर पाण्यासाठीची वणवण काय थांबली नव्हती बघा, उन्हाळ्यात तर दरवर्षी टँकर नशिबी पुजलेलाच. पण आता शासनानी नवी योजना आली आणि आता पाणी बी आलं, नळं बी आले आणि आमची तहान बी भागतीया, अशी सुखःद भावना मोधळवाडीच्या रामनाथ कुडेकर या 65 वर्षीय नागरिकाने व्यक्त केली. पिंपळगाव देपा अंतर्गत मोधळवाडी ही एक 300 कुटूंब असलेली लोकवस्ती. या ठिकाणी जिल्हा परिषदेची सातवीपर्यंत शाळा. भौतिक व नागरी सुविधाही बर्या. पण उन्हाळ्यातील पाण्याचा प्रश्न कायमच अनुत्तरीतच. या परिसरात पर्जन्यमान भरपूर मात्र खडकाळ जमीनी असल्याने कितीही पाऊस झाला तरी पाणी साठवणूक होत नाही.
त्यामुळे या ठिकाणी झेडपीचा असलेला पाझर तलाव हा फेब्रुवारीमध्ये तळ गाठलेला दिसत आणि त्यानंतरचे चार महिने हंडाभर पाण्यासाठी मोधळवाडीकरांना वणवण करावी लागत असे. अशावेळी शासनाचा टँकर हाच एकमेव पर्याय होता. याच टँकरव्दारे येथील नागरिकांची तहान भागविली जात होती. येथील ग्रामस्थ म्हणतात, आमच्या अनेक पिढ्या गेल्या मात्र येथील पाणीप्रश्न काही सुटला नाही. मात्र शासनाची जलजीवन योजना ही खर्याअर्थाने वरदान ठरताना दिसत आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात कार्यकारी अभियंता श्रीरंग गडधे यांनी आपल्या टीमच्या पुढाकारातून जुलै 2022 मध्ये मोधळवाडीच्या योजनेचे काम सुरू केले. फेब्रुवारी 2023 पासून कामाने गती घेतली आणि आता तीन महिन्यांतच ही योजना पूर्णत्वास आहे. आज मोधळवाडीत 50 हजार लिटरची नवीन पाण्याची टाकी उभारलेली आहे. जवळच्या पाझर तलावाखाली विहिर खोदून त्यातून पाणी उचलण्यात आलेले आहे. त्याव्दारे 300 कुटुंबांना नळकनेक्शन देण्यात आले आहे. आता दररोज नळाला पाणी येणार असल्याने महिला भगिनींची पाण्यासाठी होणारी पायपीट कायमची थांबणार आहे.
एकीकडे काही तालुक्यांतून जलजीवन कामाच्या दर्जाच्या तक्रारी सुरू आहेत, मात्र वेळेत काम पूर्ण करण्यासाठी कोणीही ब्र शब्द काढत नाही. तर दुसरीकडे मोधळवाडीसारख्या ठिकाणची योजना पूर्ण झाल्यानंतर ग्रामस्थांच्या चेहर्यावर झळकणारे समाधान दिसत आहे. त्यामुळे सीईओ येरेकर यांनी तक्रारींचा निपटारा करतानाच योजनेची कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्यावर भर दिल्याचे पहायला मिळत आहे.
मोधळवाडीची जलजीवन योजना पूर्णत्वास जात आहे. जलस्त्रोत चांगला आहे, या ठिकाणी 300 कनेक्शन दिली आहेत. त्यामुळे आता उन्हाळ्यातही या वाडीला टँकरची गरज भासणार नाही.
– किरण मिंडे, माजी सदस्य, पं.स.
हेही वाचा: