नगर: ‘मराठी शाळा’ मोहीम बनली कौतुकाचा विषय, मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व सांगत शाळा प्रवेशासाठी घातली भावनिक साद! | पुढारी

नगर: ‘मराठी शाळा’ मोहीम बनली कौतुकाचा विषय, मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व सांगत शाळा प्रवेशासाठी घातली भावनिक साद!

अकोले (नगर), पुढारी वृत्तसेवा: लवकरच नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे. मुलांच्या शाळा प्रवेशाचा विचार पालकांच्या मनात घोळत आहे. जिल्हा परिषदेच्या मराठी, सेमी इंग्लिश माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेण्याचे शिक्षणशास्रीय महत्त्व सांगताना, आपल्या मुलांना मराठी शाळेत प्रवेश घेण्याचे आवाहन पालकांना करण्यात येत आहे. मराठी माध्यमाच्या शाळांचा हा प्रचाररथ अकोले तालुक्यातील गावागावांत फिरताना दिसत आहे.

अकोले तालुक्यात भल्यामोठ्या एलइडी स्क्रीनवर जिल्हा परिषदेच्या शाळांतील उपक्रमांवर आधारित माहितीपट, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनस्(पीपीटी) तसेच व्हिडिओ दाखवले जात आहेत. मातृभाषेत शिक्षणाचे महत्त्व सांगणारे प्रचार पत्रके नागरिकांना वाटली जात आहेत. कोल्हार- घोटी रस्त्यासह प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा प्रचाराचे फ्लेक्स बोर्ड लावले आहेत. मोठ्या गावांमध्ये सार्वजनिक ठिकाणी मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व सांगणारे फ्लेक्स लावले आहेत.

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुणवत्तावाढीसाठी प्रशासन तसेच शिक्षक प्रयत्न करत आहेत. विद्यार्थी विकासाचे विविधांगी उपक्रम, डिजिटल क्लासरूम, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, बालआनंद मेळावा, मंथन तसेच शिष्यवृत्ती परीक्षेतील यश, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचे मार्गदर्शन, इंग्रजी विषय उत्तम प्रकारे शिक्षणासाठी शिक्षकांनी केलेले काम, विज्ञान विषयाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी इस्रोची वैशिष्ट्यपूर्ण सहल, ग्लोबल नगरी गटाच्या माध्यमातून परदेशी नगरकरांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सची संधी, मुलांना लिहिते करण्यासाठी केलेले विशेष उपक्रम… अशा अनेक उपक्रमांमुळे जिल्हाभरात इंग्रजी माध्यमातून मोठ्या संख्येने मुले जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखल झालेली आहेत.

राज्यभरात सुमारे 90 हजार ते एक लाख विद्यार्थी दरवर्षी इंग्रजी शाळांतून मराठी शाळांमध्ये दाखल होत आहेत. प्राथमिक शाळा आणि शिक्षकांच्या प्रयत्नांवर पालकांनी दाखवलेला हा विश्वास आहे. शिक्षणाचे माध्यम मातृभाषा हेच असायला हवे, याविषयी जगभरातील सर्व भाषातज्ज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ यांच्यात एकमत आहे. तरीही मधल्या काळात पालकांत मोठाच ‘माध्यम संभ्रम’ झाला होता. मातृभाषेत शिकायला मिळणे, हा प्रत्येक मुलाचा नैसर्गिक अधिकार आहे. मातृभाषेतर माध्यमातून शिकताना मुलांची नैसर्गिक अभिव्यक्तीच दडपली जाते. घोकंपट्टी करायला लागल्यामुळे मुले स्वतःला आक्रसून घेतात. याला अनेकदा पालकांचे अज्ञान कारणीभूत असते. पुढे जेव्हा ही मुले इंग्रजी शाळेतून मराठी/सेमी इंग्लिश माध्यमाच्या शाळेत येतात तेव्हा ‘ना घर का ना घाट का!’ अशी केवीलवाणी अवस्था झालेली असते.

यामुळेच अलीकडच्या काळात मराठी शाळांकडे पालकांचा ओढा वाढत आहे. समाजाच्या सहभागातून मराठी शाळा मोठ्या प्रमाणात बदलल्या आहेत. परकीय भाषेत शिकताना मुलांच्या शिक्षणाच्या वाटेत खूप सारे ‘स्पीडब्रेकर्स’ येतात. इंग्रजी भाषा उत्तम वाचता, बोलता, लिहिता आली पाहिजे. त्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेऊन सर्व विषय इंग्रजीत शिकायची गरजच नसते. अन्यथा गणित, विज्ञानातल्या अनेक संकल्पना स्पष्ट होत नाहीत. मग दहावीनंतर पुढे शिक्षण घेताना हेच रितेपण मुलांना आणि पालकांना त्रासदायक ठरते. म्हणून आपण पालकांना वेळीच सावध केले पाहिजे. यासाठी अकोले तालुक्यातील शिक्षकांनी स्वतः वर्गणी जमा करून तीन लाख रुपये उभे केले आहेत. स्वयंप्रेरणेने आपली शाळा, मराठी शाळा ही पालक प्रबोधन, प्रचार मोहिम उघडली आहे, तिला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘मातृभाषेतून शिक्षण, प्रगतीचे लक्षण’ ही प्रचार मोहिमेची टयागलाइन आहे.

प्रचाररथाला डिजिटल स्क्रीन असून त्यावर जिल्हा परिषद शाळांमधले उपक्रम दाखवले जात आहेत. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य तसेच गावोगावचे सरपंच कार्यकर्ते रथाचे उत्स्फूर्त स्वागत आणि पूजन करत आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे उपक्रम सांगत, मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह धरणार्‍या फिरणार्‍या प्रचाररथाला लावलेल्या फ्लेक्सवरील मजकूर लक्ष वेधून घेत आहे.

सुटीच्या काळात प्राथमिक शिक्षण रथासोबत असतात. प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकवणार्‍या शिक्षकांचे प्रयत्न विशेष उल्लेखनीय आहेत. भविष्यकाळात शिक्षकांसाठी विविध विषयांवर कार्यशाळा मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्यात येणार आहेत.
– जालिंदर खताळ, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, अकोले

हेही वाचा:

युपीतील गँगस्टर संजीव जीवाची न्‍यायालयात गोळ्या झाडून हत्या

Devendra Fadnavis : अचानक औरंग्याच्या इतक्या अवलादी आल्या कुठून ?: देवेंद्र फडणवीस यांचा संताप

पुणे: जेजुरी देवस्थान विश्वस्तांच्या नेमणुका घटनेनुसारच, देवस्थान अध्यक्षांचा दावा

 

Back to top button