संगमनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : गुंजाळवाडी चौफुली ते वेल्हाळे रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्टदर्जाचे होत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या गुंजाळवाडीसह वेल्हाळे परिसरातील नागरिकांनी एकत्र येत काम बंद पाडले, मात्र ठेकेदाराने ग्रामस्थांना विश्वासात न घेता पुन्हा परस्पर काम सुरू केल्याने संतप्त झालेले भाजपा किसान आघाडीचे प्रमुख रविंद्र थोरात व माजी उपसरपंच अमोल गुंजाळ यांनी उप अभियंत्यासह ठेकेदाराला चांगलेच धारेवर धरीत जाब विचारला.
संगमनेर ते वेल्हाळे रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून मंजूर झाला आहे. या रस्त्याचे काम दोन महिन्यांपूर्वी सुरू झाले होते, परंतु काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने परिसरातील नागरिकांनी ते बंद पाडले. यावेळी काम सुरू करण्याअगोदर मला फोन करा, असे रविंद्र थोरात यांनी ठेकेदाराला सांगितले होते, मात्र ठेकेदाराने कोणालाही न विचारता तीन दिवसांपूर्वी पुन्हा काम सुरू केले.
ठेकेदाराने रस्त्याची स्वच्छता न करता निकृष्ट दर्जाच्या दगड- गोट्यांची खडी वापरुन, त्यावर कमी प्रतीचे डांबर टाकण्याचे काम सुरू केले. ही बाब गुंजाळवाडी चौफुली परिसरातील नागरिकांच्या लक्षात आली. त्यांनी भाजप किसान आघा डीचे राज्य सदस्य रविंद्र थोरात यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. थोरात यांनी चौफुलीजवळ जाऊन सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी केली. काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. थोरात व गुंजाळवाडीचे माजी उपसरपंच अमोल गुंजाळ यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी काम बंद पाडले.
रस्त्याचे काम परिसरातील नागरिकांनी बंद पाडल्याचे समजताच साबांचे उप अभियंता ठाकरे घटनास्थळी आले. रविंद्र थोरात यांनी त्यांच्यावर प्रश्नाचा भडीमार केला. मला विचारल्याशिवाय काम सुरू करू नका, असे ठेकेदाराला सांगितले होते. तरीसुद्धा न ऐकता पुन्हा काम सुरू केल्यामुळे ठाकरे यांच्या समक्ष ठेकेदारास थोरात यांनी जाब विचारला. रस्त्याचे डांबरीकरण केल्यानंतर दोन वर्षात खड्डे पडले. ते ठेकेदार स्वखर्चाने भरून देतील, अशी तजवीज त्यांच्या टेंडरमध्ये केली आहे. त्यामुळे ते कसे चुकीचे काम करतील, असे सांगत त्यांनी ठेकेदाराची पाठराखण करण्याचे काम केले. यानंतर थोरात चांगलेच संतप्त झाले. त्यांनी ठेकेदारासह उपअभियंत्यास चांगले धारेवर धरले. चांगले काम न झाल्यास मी पालकमंत्री विखे पां. यांचा रस्त्याच्या कामाची पाहणी करण्याचा दौरा लावेल, अशी तंबी थोरात यांनी ठेकेदारास दिली.
गुंजाळवाडी चौफुली ते वेल्हाळे या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. कामाच्या दर्जाबाबत महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्याकडे तक्रार करणार आहोत. ठेकेदाराने रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे न केल्यास पालकमंत्र्यांकडे कारवाई करण्याची मागणी करणार आहे.
– रविंद्र थोरात, भाजप किसान आघाडी राज्य सदस्य
हेही वाचा