घोसपुरी-चिखली-कोरेगाव एमआयडीसीसाठी हालचाली | पुढारी

घोसपुरी-चिखली-कोरेगाव एमआयडीसीसाठी हालचाली

वाळकी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या नगर तालुक्यातील घोसपुरी, तसेच श्रीगोंदा तालुक्यातील चिखली-कोरेगाव एमआयडीसीचा विषय पुन्हा एकदा राज्य शासनाच्या अजेंड्यावर आला आहे. या दोन्ही ठिकाणच्या प्रस्तावित औद्योगिक क्षेत्राची स्थळ पाहणी केली जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी एमआयडीसी होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

सुमारे 12 वर्षांपूर्वी जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्या कार्यकाळात नगर तालुक्यातील घोसपुरी, हिवरे झरे, सारोळा कासार, बाबुर्डी बेंद परिसरात, तसेच श्रीगोंदा तालुक्यातील चिखली- कोरेगाव येथे नव्याने एमआयडीसी स्थापन करण्याचा प्रस्ताव समोर आला होता. त्यावेळी त्यावर बरीच चर्चाही रंगली होती. गावोगावी बैठकाही झाल्या. मात्र, पुढे हा विषय प्रलंबित पडला.

आता नव्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) त्या प्रस्तावावरील धूळ झटकली आहे. एमआयडीसीचे महाव्यवस्थापक (भूसंपादन) संदीप आहेर यांनी नुकतेच एक परिपत्रक काढले आहे. त्यात नगर जिल्ह्यातील प्रस्तावित औद्योगिक क्षेत्राची स्थळ पाहणी करण्याचे आदेश एमआयडीसीच्या नाशिक विभागाचे प्रादेशिक अधिकार्‍याना दिले आहेत.

त्यानुसार प्रस्तावित असलेल्या नगर तालुक्यातील घोसपुरी, हिवरे झरे, सारोळा कासार, बाबुर्डी बेंद परिसरातील 2 हजार 25 हेक्टर क्षेत्राची, तर श्रीगोंदा तालुक्यातील चिखली-कोरेगाव परिसरातील 1311.92 हेक्टर एवढ्या क्षेत्राची स्थळ पाहणी भूनिवड समितीच्या सदस्यांमार्फत दि. 1 सप्टेंबर रोजी केली जाणार आहे.

हेही वाचा

पुणे : प्र-कुलगुरुपदी पराग काळकर ; विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय

अहमदनगर : एसपींच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट

नेवाशात पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात

Back to top button