

नगर : पुढारी वृत्त्तसेवा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून 2 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. या वर्षीही स्वच्छ भारत दिवस 2023 च्या निमित्ताने 15 सप्टेबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा हा उपक्रम जिल्हाभरात राबविण्यास सुरवात झाली आहे. जिल्हाभरात महाश्रमदानाच्या माध्यमातून जिल्हयातील गावे कचरा मुक्त करणारअसल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिली. नगर पंचायत समिती येथे रविवारी महाश्रमदान अभियानाचे उद्घाटन आशिष येरेकर यांनी स्वतः हातात झाडू घेवून केले. यावेळी प्रकल्प संचालक समर्थ शेवाळे, गटविकास अधिकारी श्रीकांत खरात आदी उपस्थित होते.
संबंधित बातम्या :
भारतीय स्वच्छता लीग 2.0 स्वच्छतेसाठी युवकांच्या कृतीला चालना देण्यासाठी युवकांच्या नेतृत्वाखाली सर्व गटाना एकत्र करून त्यांच्या गटाकडून पर्यावरण संवर्धनासाठी टेकड्यांची स्वच्छता करण्यासाठी 17 सप्टेबर 2023 रोजी स्वच्छ मोहीमे सोबत इतर उपक्रम राबविण्याचे निर्देश केंद्र शासनाकडून देण्यात आले आहेत. स्वच्छता ही सेवा 2023 या वर्षीची थीम कचरामुक्त भारत ही आहे. यामध्ये दृष्यमान स्वच्छता व सफाई मित्र कल्याण या वरती लक्ष केंद्रीत केले आहे. ग्रामीण भागातील बसस्थानक, पर्यटनस्थळ, वारसा स्थळे, नदी किनारे, घाट, नाले आदी ठिकाणी सदर मोहीम राबविली जाणार आहे.