

कर्जत(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : कर्जत बाजार समितीची पहिली बैठक ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी गुरुवारी रोखली. आक्रमक शिवसैनिकांमुळे सभा रद्द करावी लागली. कर्जत बाजार समितीच्या नूतन पदाधिकार्यांची निवड नुकतीच झाली. आमदार राम शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. मात्र आज संचालक मंडळाची पहिली बैठक बाजार समितीच्या सभागृहात सुरू होणार होती; मात्र मोठ्या संख्येने शिवसैनिक सभागृहात घुसले. आजची बैठक होऊ देणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. यानंतर सभापती काकासाहेब तापकीर यांनी बैठक रद्द केल्याचा निर्णय जाहीर केला.
सभापती-उपसभापती व बहुसंख्य संचालक उपस्थित असतानाही शिवसैनिकांमुळे ही सभा रद्द करण्याची नामुष्की भाजपवर आली आहे. बाजार समितीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना ठाकरे व शिंदे गट एकत्र आहेत. सात संचालक भाजपचे व शिवसेनेचा प्रत्येकी एक असे नऊ संचालक असून यांची युती आहे, तर विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांचे नऊ संचालक आहेत.
यासंदर्भात सभापती तापकीर यांच्याशी संवाद साधला असता, काही अपरिहार्य कारणामुळे आजची बैठक रद्द केल्याचे व तसे पत्र सर्व संचालकांना दिल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. मात्र बैठक रद्द करण्याचे कारण त्यांनी सांगितले नाही. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे संचालक गुलाब तनपुरे म्हणाले, की कोरम पूर्ण असताना सभा रद्द करणे बेकायदेशीर आहे. बाजार समितीच्या इतिहासात अशा पद्धतीने पहिली सभा सत्ताधार्यांच्या आपसातील अवमेळामुळे रद्द करण्याची पहिलीच घटना आहे.
काँग्रेसचे संचालक अॅड. हर्ष शेवाळे यांनीही आजची सभा रद्द करण्याच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. शेवाळे म्हणाले, की आमदार राम शिंदे व भाजपने बाजार समितीची सत्ता मिळवली, राम शिंदे यांनी मोठा गाजावाजा करून व बॅनरबाजी करून पदभार नवीन पदाधिकार्यांना दिला; मात्र चार दिवसांत संस्थेमध्ये काय परिस्थिती या मंडळींनी करून ठेवली आहे हे संपूर्ण तालुक्याच्या जनतेच्या आता लक्षात आले आहे.
या संदर्भात शिवसेनेच्या एका पदाधिकार्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, की शिवसेनेचे तालुकाप्रमुख बळीराम यादव व सर्व शिवसैनिक हे कर्जत तालुक्यात माजी मंत्री राम शिंदे यांच्या सभेत आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानादेखील कर्जतमध्ये मात्र राम शिंदे यांच्या समवेत ठाकरेंची शिवसेना सोबत होती.
बाजार समितीच्या निवडणुकीतदेखील ठाकरेंची शिवसेना राम शिंदे यांच्यासोबत होते. मात्र पदाधिकारी निवडीमध्ये शिवसेनेची फसवणूक करण्यात आली. शिवसेनेचा वापर केवळ निवडणुकीपुरताच करण्यात येत असल्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले. सत्तेमध्ये शिवसेनेला वाटा मिळालाच पाहिजे यासाठी शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. जर शिवसेनेला सत्ता दिली नाही तर बाजार समितीचे कामकाज शिवसैनिक चालू देणार नाहीत, असा ठाम निर्धार शिवसैनिकांनी केला आहे.
हेही वाचा