Scholarship News : परदेश शिष्यवृत्ती अर्जासाठी मुदतवाढ | पुढारी

Scholarship News : परदेश शिष्यवृत्ती अर्जासाठी मुदतवाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील 75 विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती (Scholarship) प्रदान करण्यात येते. सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून, त्यानुसार इच्छुक विद्यार्थ्यांना ५ जुलैपर्यंत अर्ज सादर करण्यात येणार आहे.

अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पीएच.डी.) विशेष अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत हा या योजनेचा मुख्य उद्देश होय. सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी (Scholarship) अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज सदर करण्याची अंतिम मुदत २० जूनला संपली आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार अर्जास मुदतवाढ देण्यात आल्याचे सामाजिक न्याय विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना विहीत नमुन्यातील अर्ज शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरील (Official website) रोजगार या लिंकवरून डाउनलोड करता येणार आहे. या योजनेसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना विमान प्रवास भाडे, परदेशातील शैक्षणिक संस्थेची शिक्षण फी, निर्वाह भत्ता, आकस्मिक खर्च याचा लाभ मिळणार आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्ष व पीएच.डी.साठी 40 वर्ष ही कमाल वयोमर्यादा असेल. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावरील एमडी व एमएस अभ्यासक्रमच प्रवेशासाठी पात्र असल्याचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले.

हेही वाचा:

Back to top button