अखेर ‘त्या’ अनधिकृत बांधकामावर हातोडा

अखेर ‘त्या’ अनधिकृत बांधकामावर हातोडा
संगमनेर : पुढारी वृत्तसेवा
संगमनेर तालुक्यातील समनापूर येथील ऐतिहासिक कालीन अहिल्याबाई होळकर बारवेवर केलेले राजू रोकडे यांनी केलेले अनधिकृत बांधकाम प्रांताधिकार्‍यांच्या आदेशानुसार जेसीबीच्या साहाय्याने अखेर काल जमीनदोस्त करत प्राचीनकालीन बारव मोकळी करण्यात आली. बारवेवर गावातीलच रोकडे यांनी अनधिकृतपणे बांधकाम केले होते.
याबाबत अहिल्याबाई होळकर युवा मंचाचे कार्यकर्ते देवा शेरमाळे, शिवाजी शेरमाळे, संतोष शेरमाळे आदींसह कार्यकर्त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते, तसेच महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाकडे सुराज्य निर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष आकाश पवार यांनी तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत पुरातत्व विभागाच्या संचालिका आरती आळे यांनी सदरचे बांधकाम अनधिकृत असून ते तत्काळ बंद करण्यात यावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सक्त आदेश दिले होते.
संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरुळे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत राजू रोकडे यांनी प्राचीन बारवर केलेल्या बांधकामाची परवानगी घेतली नसल्याचे उघड झाले. त्यामुळे प्रांतधिकारी डॉ. मंगरूळे आदेशानंतर काल सकाळी 10 वा. संगमनेरचे नायब तहसीलदार उमाकांत कडनोर, मंडलाधिकारी बाबाजी जेडगुले, कामगार तलाठी संतोष लंके, ग्रामविकास अधिकारी सुनील नागरे, का. पो. गणेश शेरमाळे, सरपंच कमल बर्डे यांच्या प्रमुख उपस्थित जेसीबीच्या साह्याने अहिल्याबाई होळकर प्राचीन कालीन बारवेवर राजू रोकडे यांनी केलेले अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या साह्याने तोडण्यात आले.
  • अखेर आमच्या लढ्याला यश : शेरमाळे
 गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील बारवेवर अनधिकृत बांधकाम काढण्याचा लढा लढत होतो. प्रांताधिकारी आणि पुरातत्व खात्याच्या अधिकार्‍यांनी हे बांधकाम पाडण्याचे आदेश दिल्याने आमच्या लढ्याला यश आले आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून अतिक्रमण येत असलेली ही बारव अखेर अतिक्रमणमुक्त झाली असल्यामुळे समाजामध्ये समाधानाचे वातावरण असल्याची भावना देवा शेरमाळे यांनी व्यक्त केली.
हे ही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news