स्टेशनवर राहणार्‍या भाऊ-बहीण ज्येष्ठांना मिळाले घर | पुढारी

स्टेशनवर राहणार्‍या भाऊ-बहीण ज्येष्ठांना मिळाले घर

प्रसाद जगताप
पुणे : रेल्वे स्थानकावरील हे दोन वयोवृद्ध कोण? ते कुठून आले? इथे काय करत होते? या प्रश्नाचे उत्तर जरी गूढ असले तरीसुद्धा त्या दोघांना अखेर हक्काचा निवारा मिळाला आहे. गेल्या दीड महिन्यांपासून रेल्वेच्या पुणे स्थानकालाच या दोन ज्येष्ठांनी घरच बनवलं होतं. अनेक दिवसांच्या निरीक्षणानंतर हे दोन्ही ज्येष्ठ एकटेच असल्याचे निदर्शनास आले. हे दोन ज्येष्ठ दोघेही भाऊ-बहीण. एकाचे वय साधारण 61, तर महिलेचे वय 68 ते 70 च्या घरात होते.
रेल्वे स्थानकावरच अनेक दिवसांपासून असल्यामुळे येथे नियमित ये-जा करणारे रेल्वे कर्मचारी, सामाजिक संस्थांच्या लोकांनी त्यांची विचारपूस केली. मात्र, ते काही थांगपत्ताच लागू देत नव्हते. त्यांना खायला दिले तरी ते घेत नव्हते. यामुळे त्यांची स्थिती खूपच खालावली. दोघेही आजारी पडले होते. त्यांचे कपडे काळेकुट्ट झाले होते, अंघोळ नसल्यामुळे त्यांच्या शरीराचा दुर्गंध परिसरात पसरला होता. त्यांची ही अवस्था पाहून रेल्वे अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली ‘होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन’च्या एका टीमने ‘आपलं घर…’ या संस्थेत राहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. आता हे दोघेही एकदम सुस्थितीत आहेत.

इंग्रजी भाषेवर प्रभुत्व

रेल्वेस्थानकावर आढळलेल्या दोन्ही ज्येष्ठांशी संवाद साधला असता, त्यांचे इंग्रजी भाषेवर चांगलेच प्रभुत्व असल्याचे दिसले. ते त्यांच्याजवळ येणार्‍या प्रत्येकाशी इंग्रजीमध्ये बोलत होते. मात्र, एवढे शिकलेले असतानाही त्यांच्यावर अशी वेळ आली, याबद्दल येथून ये-जा करणारे हळहळत होते.
रेल्वेस्थानकावरील या दोन ज्येष्ठांची माहिती समजताच तेथे जाऊन त्यांची चौकशी केली. या वेळी त्यांचे कोणीही नसल्याचे समजले. मात्र, ते हैदराबाद येथील असल्याची माहिती मिळाली आहे. आमच्या टीमच्या मदतीने आम्ही त्यांना ‘आपलं घर..’ या संस्थेत दाखल केले आहे. आता ते चांगल्या स्थितीमध्ये आहेत.
                                                               – हृषीकेश डिंबळे, प्रकल्प समन्वयक, होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन

Back to top button