मिरजगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील माहिजळगांव चौफुल्यावर काम सुरू असल्यामुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून, ग्रामस्थांबरोबर व्यावसायिक व प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. माहिजळगांव येथील ग्रामस्थ व व्यावसायिक सध्या विविध समस्यांनी त्रस्त आहेत. नगर-सोलापूर व श्रीगोंदा-जामखेड महामार्गावरील माहिजळगांव चौफुला सध्या समस्यांचे आगार बनला आहे. श्रीगोंदा-जामखेड महामार्गाचे काम तीन वर्षांपासून सुरू आहे. हा रस्ता काँक्रिटचा तयार करण्यात येणार आहे.
या रस्त्याचे काम करीत असलेल्या निखिल कन्स्ट्रक्शन कंपनीने माहिजळगांव चौफुला येथे रस्ता खोदून ठेवला आहे. चौफुल्यावरील काम केले नाही. त्यामुळे येथे मोठया प्रमाणावर धुराळा उडतो आहे. त्यामुळे माहिजळगांव येथील व्यावसायिक व रहिवासी धुळीने त्रस्त झाले आहेत. ग्रामपंचायतीने निखिल कन्स्ट्रक्शन तसेच बांधकाम अधिकार्यांना पत्र देऊन येथील काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. मात्र, फक्त खड्डे बुजविले आहेत. त्यामुळे धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याकडे लक्ष दिले नाही, तर माहिजळगांव येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
माहिजळगांव चौफुल्याप्रमाणेच वालवड, चिंचोली काळदात, टाकळी खंडेश्वरी, अरणगांव, खडकत, पाटोदा येथील ग्रामस्थ व वाहनचालकांना अशाच समस्यांचा सामना करावा लागतो
– नवनाथ शिंदे,
अध्यक्ष, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विचारमंचमाहिजळगांव चौफुल्यावर दोन वर्षांपासून काम सुरू आहे. वाहनांच्या वर्दळीने धूळ उडते. त्यामुळे रुग्णसंख्या वाढली आहे. खाद्य पदार्थावर धूळ बसते आहे. ती धूळ थेट पोटात जाते आहे. धूळमुक्त चौफुला होणे आवश्यक आहे.
– डॉ. राजेश तोरडमल,
माहिजळगांव.
हेही वाचा