चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
चांदवडसह जिल्हयात व राज्यात जोरदार पाऊस पडावा यासाठी शहरातील समस्त मुस्लीम समाज बांधवांनी येथील बुखारी कब्रस्तान मैदानात सामूहिक नमाजपठण करून समाधानकारक पाऊस पाडण्याचे साकडे घातले. या नमाज पठणासाठी शहरातील सर्व मुस्लीम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.
चालू वर्षी नाशिक जिल्ह्यासह समस्त राज्यात कोरडा दुष्काळ पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. आधीच शेतकरी, व्यापारी, कामगार, मजुर इ. घटक कोरोना काळातून कसेबसे सावरत आहेत. त्यातच यंदाच्या वर्षी पाऊस न पडल्याने शेतीमालाचे उत्पादन अल्प प्रमाणात होईल, दुष्काळामुळे भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होवू शकते. त्यामुळे चांदवड शहर मुस्लिम समाजातर्फे राज्यात, जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडावा याकरीता सामुहिक नमाज पठणाचा कार्यक्रम बुधवार (दि.६) रोजी आयोजीत करण्यात आला होता.
सामूहिक नमाज पठणासाठी शहरातील सर्व मुस्लिम समाज येथील चौक मस्जिद जमुन, श्रीराम रोड, मुल्लावाडा, नगरपरिषद, शाही मस्जिद या मार्गाने चिंचबनातील बुखारी कब्रस्तान मस्जिद येथे सामुहिक नमाज पठण करण्यात आली. यावेळी नमाज पठण व प्रबोधन मुफ्ती मोसिन यांनी केले व नमाज पठाण हफिज शहादत यांनी केले. यावेळी चांदवड शहरातील सर्व मस्जिदीतील मौलाना व विश्वस्त, शहरातील समस्त मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन परवेज पठाण, अल्ताफ तांबोळी, जाहिद घांसी, मोहम्मंद साहेब, हाजी मुस्ताक, जाकीर शाह, आजाद भाई, गुल्लुभाई घांसी, वासिफ खान, दानिश शेख, बबलु घांसी, कासिफ शेख, अल्ताफ जे. डी., इकबाल बागवान, रहेमान बागवान, रिझवान घांसी यांनी केले.