‘माणिकडोह’तून विसर्ग ; केवळ 60 टक्के पाणीसाठा शिल्लक | पुढारी

‘माणिकडोह’तून विसर्ग ; केवळ 60 टक्के पाणीसाठा शिल्लक

लेण्याद्री : पुढारी वृत्तसेवा :  जुन्नर तालुक्याचा आदिवासी पश्चिम पट्टा, जुन्नर शहर व परिसरातील लहान-मोठ्या गावांची तहान भागविणार्‍या माणिकडोह धरणातून सोमवारी (दि. 4) रात्री पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. वेळोवेळी या धरणातील पाण्याचा वापर नगर, सोलापूर जिल्ह्यांसाठी होत असतो. यंदा मात्र धरणात केवळ 60 टक्के पाणी (6.17 टीएमसी) शिल्लक असताना हा विसर्ग सुरू झाल्यामुळे धरण परिसरातील शेतकर्‍यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. दरम्यान, कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे हे छोटे आवर्तन सोडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

येडगाव धरणातून गेल्या 28 तारखेपासून श्रीगोंदा, पारनेर परिसरातील लहान मोठे-तलाव तसेच बंधारे भरण्यासाठी कुकडी डावा कालव्याचे आवर्तन सुरू आहे. कालवा सल्लागार समितीच्या शनिवारी (दि. 2) झालेल्या बैठकीत हे आवर्तन आणखी दोन दिवसांनी वाढविल्यामुळे येत्या 10 सप्टेंबरपर्यंत पाणी सोडले जाणार आहे. येडगाव धरणातून 1400 क्युसेक वेगाने पाणी पुढील जिल्ह्यांत जात असल्यामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. येडगाव धरणात मंगळवारी (दि. 5) सायंकाळी केवळ 18 टक्के पाणी शिल्लक होते.
दरम्यान, या आवर्तनासाठी डिंभे धरणातून येडगाव धरणात पाणी आणले जात असते.

सध्या डिंभे धरणात तब्बल 92 टक्के (11.49 टीएमसी) पाणीसाठा आहे. मात्र, जुने पाट व कालवे असल्यामुळे येथील डावा कालव्यातून जास्त वेगाने पाणी सोडता येत नसल्याचे कारण नेहमीच सांगितले जाते. सध्या डिंभे धरणातून केवळ 600 क्युसेकने विसर्ग सुरू असल्यामुळे येडगावमधून होणारे आवर्तन बाधित होऊ शकते. त्यामुळेच माणिकडोह येथून 1000 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात
येत आहे, अशी चर्चा शेतकर्‍यांमध्ये आहे.

Back to top button