भवानीनगर : पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातील उदमाईवाडी येथील प्रगतशील शेतकरी प्रदीप घाडगे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन घेतले असून, या डाळिंबाची बांगलादेशमध्ये निर्यात केली आहे. प्रदीप घाडगे यांनी दीड एकर क्षेत्रामध्ये साडेसहाशे भगवा जातीच्या डाळिंबाच्या झाडांची लागवड केलेली आहे. या डाळिंबाच्या बागेतील 60 टक्क्यांहून अधिक फळांचा आकार 500 ते 600 ग्रॅमपर्यंत आहे. घाडगे यांच्या डाळिंबबागेची पाहणी करण्यासाठी अनेक शेतकरी येत आहेत. उत्तम प्रतीच्या डाळिंबाच्या फळांना निर्यातीसाठी 102 रुपये किलोप्रमाणे दर मिळाला आहे.
या साडेसहाशे डाळिंबाच्या झाडांपासून घाडगे यांनी दोन टप्प्यांमध्ये पाच व साडेपाच अशी साडेदहा टन डाळिंबाची निर्यात केली आहे. दीड ते दोन टन डाळिंबाची फळे झाडांवर असून, ती स्थानिक बाजारपेठेमध्ये विक्री करण्यात येणार आहे. घाडगे यांनी बागेमध्ये हवामानाची माहिती मिळण्यासाठी 'वेदर स्टेशन' बसविले आहे. त्याच्या माध्यमातून मिळणार्या हवामानाच्या माहितीवरून त्यांनी बागेमध्ये पाणी, खत, औषधांचे योग्य नियोजन केले आहे. सेंद्रिय खताचा वापर व पाण्याचे योग्य नियोजन या माध्यमातून त्यांनी निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन घेतले आहे. घाडगे यांच्या तीन वर्षांच्या डाळिंबाच्या प्रत्येक झाडावरून सरासरी 20 किलो उत्पन्न आणि प्रत्येक फळाला पन्नास रुपयांहून अधिक दर मिळाला आहे.
हेही वाचा :