

लोणावळा(पुणे) : बँकेमध्ये नोकरी करणार्या एका महिलेला केवळ ती दृष्टिहीन असल्याचे कारण देत गॅस एजन्सीधारकाकडून कनेक्शन नाकारण्यात आल्याची घटना घडली आहे. महिलेची नुकतीच मुंबईतून लोणावळ्यात बदली झाली आहे. त्यांनी लोणावळ्यात आल्यानंतर गॅस कनेक्शन घेण्यासाठी अर्ज केल्यावर हा प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचे नाव संगीता कोल्हापूरे असून, त्यांची नुकतीच ठाण्यातून लोणावळा येथे बदली झाली आहे. येथे आल्यावर त्यांनी एक खोली भाड्याने घेतली. जेवण बनविण्यासाठी त्यांना गॅसची आवश्यकता असल्याने त्यांनी येथील परमार गॅस एजन्सीकडे नवीन कनेक्शनची मागणी केली. परंतु, एजन्सीने त्यांना त्या दृष्टिहीन असल्याचे कारण देत कनेक्शन नाकारले.
विशेष म्हणजे गॅस एजन्सीने त्यांना तसे लेखी लिहून दिले आहे. एका दृष्टिहीन महिलेबरोबर घडलेला प्रकार हा निंदनीय असून, याबाबत संबंधित गॅस एजन्सी मालकाला जाब विचारला जाईल, असे काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस निखिल कविश्वर व माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी सांगितले.
यावर आपण दृष्टिहिन असलो तरी पोटासाठी जेवण बनवावे लागत असल्याच्या भावना संगीता कोल्हापूरे यांनी व्यक्त केल्या. तर, परमार गॅस एजन्सीचे मालक प्रकाश परमार म्हणाले, की कंपनीचे काही नियम आहेत, त्यानुसार, आम्ही परवानगी नाकारली आहे. या महिला दृष्टिहीन आहेत. भविष्यात काही दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? मात्र, त्यांचे अंडरटेकिंग घेऊन गॅसकनेक्शन देता येऊ शकेल का, याबाबत कंपनीकडे विचारणा केली आहे.
हेही वाचा