मारूल हवेली : पुढारी वृत्तसेवा : आभाळाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी पावसाच्या आगमनाने सुखावला आहे. शुक्रवारी दुपारपासून पाटण तालुक्यात हलक्या सरी बरसू लागल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
जून महिना संपत चालला तरी मान्सून सक्रिय न झाल्याने सर्वांच्याच पुढे चिंतेचे ढग दाटले होते. मान्सून पूर्व पावसानेही अपेक्षित हजेरी लावली नव्हती. तरीदेखील शेतक-यांनी पेरणीपूर्वीची कामे आटोपून शेत तयार करून ठेवली आहेत. मात्र, पाऊल लांबल्याने खरीपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. पेरण्या लांबल्यास शेतकर्यांचे नियोजन कोलमडून पडणार अशी विचित्र अवस्था शेतकर्यांची झाली होती. ऐन पावसाळयात कडक ऊन व वाढलेल्या उकाड्याने जनता हैराण झाली होती. त्यातच पावसाची चिन्हे दिसत नसल्याने मान्सून दाखल होणार की नाही? याबाबत चिंता व्यक्त केली जात होती.
शुक्रवारी (दि.२३) रोजी सकाळपासून आभाळात भराभर ढग जमा होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला. काही ठिकाणी पावसाने हजेरी लावत शेतकर्यांमध्ये आनंद पेरला गेला. कोयना व पाटण परिसरात हलक्या सरी बरसल्या होत्या. तर शनिवारी (दि.२४) रोजी सकाळी तालुक्यात पावसाने हजेरी लावली. पावसाच्या आगमनाने सर्वत्र समाधान व्यक्त होत असले तरी अजूनही सुरुवातीला भरपूर प्रमाणात पाऊस होणे आवश्यक आहे.
पेरण्यांना प्रारंभ करण्यासाठी तालुक्यात जोरदार पावसाची आवश्यकता असल्याची अपेक्षा शेतकरी करीत आहेत. आभाळात ढग दाटून येऊन सरी मागून सरी येऊ लागल्या. चांगला पाऊस पडेल अशा आशा पल्लवीत झाल्या आहेत.
हेही वाचा :