बारामतीत आजपर्यंत सरासरीच्या फक्त 13 टक्के पाऊस

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on
Updated on

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यात जून महिन्यात आतापर्यंत 87.10 मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात 11.3 मिमी म्हणजे सरासरीच्या 13 टक्के पाऊस पडला आहे. तालुक्यातील खरीप हंगामातील पेरणीचे क्षेत्र 19 हजार 492 हेक्टर असून, आतापर्यंत 395.8 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांनी दिली.

हवामान बदलानुसार सामान्यपणे पाऊस येण्याचा कालावधी पुढे सरकला आहे. त्यामुळे नवीन सामान्य पाऊस कालावधी (न्यू नॉर्मल मान्सून पिरीअड) हा 24 ते 25 जून असेल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. या नवीन सामान्य पाऊस कालावधीचा विचार करता शेतकर्‍यांनी पेरणी करताना लवकर येणार्‍या व पाण्याचा ताण सहन करणार्‍या वाणांची लागवडीसाठी निवड करावी. पाऊस उशिरा आल्यामुळे शेतकर्‍यांनी धूळपेरणी करू नये. पेरणीसाठी साधारणपणे 20 टक्के जादा बियाण्यांचा वापर करावा. सलग संपूर्ण क्षेत्रावर एकच पीक न घेता आंतरपीकपद्धतीचा वापर करावा.

पेरणी करताना रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. जमिनीतील ओलाव्याचे संवर्धन करण्यासाठी आच्छादनासारख्या तंत्राचा वापर करावा. हवामान खात्यामार्फत पुढील पाच दिवसांचा पावसाचा अंदाज दिला जातो. या पावसाच्या अंदाजाची माहिती प्रसिद्धिमाध्यमांद्वारे शेतकर्‍यांना देण्यात येईल. कृषी विद्यापीठ, कृषी विद्यापीठांचे संशोधन केंद्र व कृषी विज्ञान केंद्र यांच्या साह्याने स्थानिक आपत्कालीन पीक नियोजन करण्यात येणार आहे. क्षेत्रीय यंत्रणांना या माहितीचा मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार करण्याबाबत सूचना कृषी विभागामार्फत देण्यात आल्या आहेत.

मान्सूनचा अंदाज घेऊन पेरणीच्या वेळी पुरेशा प्रमाणात उत्तम दर्जाचे बी-बियाणे, खते व कीटकनाशके शेतकर्‍यांना आवश्यकतेनुसार व रास्त दरात उपलब्ध करून देण्याची खबरदारी कृषी विभागाकडून घेण्यात येत आहे. साधारणत: 80 ते 100 मिमी पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी, पेरणीची घाई करू नये, असे आवाहनही कृषी विभागाकडून करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news