पुणे : शिक्षकांविना विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला! | पुढारी

पुणे : शिक्षकांविना विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला!

शंकर कवडे :

येरवडा परिसरातील लक्ष्मीनगर भागातील महापालिकेच्या शहीद अब्दुल हमीद उर्दू प्राथमिक शाळांमध्ये मुख्याध्यापक व शिक्षकांची नियुक्ती रखडल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन पाच दिवस लोटले तरी शाळेत शिक्षक व मुख्याध्यापकांची नियुक्ती करण्यात आली नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन त्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी शिक्षकांचा मोठा हात असतो. मात्र, प्रत्यक्षात शाळेत गेल्यानंतर शिक्षाकांअभावी या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव येरवडा येथील मध्यवस्तीतील शहीद अब्दुल हमीद उर्दू प्राथमिक शाळा क्र. 208 मुलांची येथे दिसून येत आहे. महापालिकेची शाळा असलेल्या या शाळेची नामवंत शाळेत गणना होते. या शाळेत 343 विद्यार्थी आहेत. मात्र, काही वर्षांपासून या शाळेस शिक्षकच नाहीत.

शाळेत पहिलीसाठी 51 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर, तिसरीची विद्यार्थिसंख्याही 51 च्या घरात असूनही या दोन वर्गांना शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. मुख्याध्यापक पदही रिक्त आहे. रिक्त जागेची पूर्तता करणे आवश्यक आहे. याबाबत, शाळेकडून 20 फेब—ुवारी, 25 एप्रिल व 5 मे रोजी मागणीपत्र पाठवूनही प्रशासनाने अद्याप कोणतेही पाऊल उचलले नसल्याने पालक वर्गांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

माझी तीन मुले शाळेत आहेत. शाळेत शिक्षक तसेच मुख्याध्यापक नसल्याने त्यांच्या शिक्षणाची चिंता वाटत आहे. आर्थिक परिस्थितीसह ही शाळा चांगली असल्याने मुलांना या शाळेत दाखल केले. मात्र, शाळा असूनही दर्जेदार शिक्षण मात्र मिळत नाही. त्यामुळे, या ठिकाणी त्वरित शिक्षक तसेच मुख्याध्यापकांची नियुक्ती करण्याची आवश्यकता आहे.
                                                                                – आमरीन सौदागर, पालक

माझा एक मुलगा दुसरी व एक मुलगा पहिलीत आहे. कोरोनाकाळापासून येथे शिक्षण घेण्यात खूप अडचणी येत आहेत. शाळेत शिक्षक व मुख्याध्यापक नसतील तर मुलांना काय शिक्षण मिळेल हा एक प्रश्न पडतो. शाळेपासून वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करूनही काम मार्गी लागले नाही. येत्या काळात आंदोलनाशिवाय आम्हा पालकांसमोर दुसरा पर्याय नाही.
– सोहेल शेख, पालक

Back to top button