

नगर : पुढारी वृत्तसेवा
आर्थिक गैरव्यवहारामुळे कायमच चर्चेत असलेल्या नगर अर्बन मल्टिस्टेट बँकेसंदर्भात शुक्रवारी आणखी एक गुन्हा नगर पोलिसांत नोंदविण्यात आला. 28 प्रकरणात तब्बल दीडशे कोटीची फसवणूक झाल्याची ही फिर्याद सभासद राजेंद्र गांधी यांनी दिली आहे. खातेदार, ठेवीदार आणि सभासदांची नगर अर्बन मल्टिस्टेट बँकेने फसवणूक केल्याचा हा पाचवा गुन्हा दारखल झाल्याने नगरच्या बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
राजेंद्र ताराचंद गांधी (रा. नगर) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार 2014 ते 2019 या कालावधीत अर्बन बँकेचे दिवंगत चेअरमन माजी खासदार दिलीप गांधी, संचालक मंडळातील सदस्य, बँकेचे अधिकारी, आशुतोष लांडगे, सचिन गायकवाड आणि बँकेच्या मुख्य शाखेचे तत्कालीन शाखा व्यवस्थापक अच्युत घनशाम बल्लाळ यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.नगर अर्बन बँकेचे संचालक मंडळ, वरिष्ठ अधिकारी, काही कर्जदार व इतर संबंधित व्यक्ती यांनी कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार व अपहार करुन बँकेचे आर्थिक नुकसान केल्यामुळे गांधी यांनी गैरव्यवहारांची माहिती घेतली. दोषींवर कारवाईसाठी त्यांनी दिल्ली येथील सेंट्रल रजिष्ट्रार आणि मुंबईच्या रिझर्व्ह बँक तसेच नगर एसपींकडे पत्रव्यवहार केला. दोषी व्यक्तीं विरुध्द फौजदारी कारवाई करावी, असे निर्देश नगरच्या एसपींना द्यावेत, यासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात 2020 मध्ये रिट पिटीशन दाखल केलेली आहे.
ऑडिट आणि आरबीआयच्या रिपोर्टनंतर घोटाळा उघड ः फिर्यादी गांधी हे 1984 पासून बँकेचे सभासद व खातेदार आहेत. 2008 ते 2014 या कालावधीत ते बँकेचे संचालक होते. 2013 मध्ये सदर नगर अर्बन बँकेचे रुपांतर नगर अर्बन मल्टिस्टेट बँकेत झाले. 2014 मधील बँकेच्या निवडणुकीत गांधी यांच्यासह त्यांच्या पॅनलचा पराभव झाला. 2015 पासून बँकेच्या इतर सभासदांना लाभांश मिळणे बंद झाले. तसेच बँकेच्या ठेवीदारांना व खातेदारांना बँकेमध्ये विविध योजनांमध्ये गुंतविलेल्या ठेवींचा परतावा, तसेच ठेवीची रक्कम ठेवीदारांना परत मिळाल्या नाहीत. त्यामुळे राजेंद्र गांधी यांनी 2015-16 2016-17, 2017-18 2018-19, 2019-20 व 2020 21 चे वैधानिक लेखापरीक्षण अहवाल व रिझव्ह बँकेचे तपासणीचे अहवालाच्या प्रती प्राप्त करून घेवून, त्याचे अवलोकन केले. त्यात हा गैरव्यवहार झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
संगमनेर येथील मे. पारीस इस्पात, मे. पुखराज ट्रेडींग कंपनी, मे. पुखराज इस्पात यांचे कर्ज खाते, शिर्डीतील मे हॉटेल सिटी हर्ट, मे हटेल साई संगम , मे. एस. एस. डेव्हलपर्स यांचे कर्ज खाते, जालना येथील मे तुकाराम रंगनाथ एखंडे यांचे कर्ज खाते, केडगाव येथील मे. मंत्रा प्रिंटर्स कर्ज खाते, औरंगाबाद शाखेतील सोनेतारण घोटाळ्यातील 1 कोटी 21 लाख रुपयांचे बाबत कारवाई व वसुली, सिन्नर शाखेतील दीड लाखाचा सोनेतारण घोटाळा, श्रीगोंद्यातील श्री घृष्णेश्वर मिल्क प्रडक्टस तसेच राहाता येथील मे. हिंदुस्थान ट्रेडर्स, राहाता येथील मे. ब्युटी वर्ल्ड, मुख्य कार्यालयातील मे. ए. आर. टेक्नलजिस, श्रीगोंदा येथील मे. जिजाई मिल्क या कर्ज खात्यात झालेली फसवणूक प्रकरणाचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे.
हे ही वाचलं का