पंजाब, यूपीत तिसर्‍या टप्प्यातील प्रचार थांबला, उद्या मतदान | पुढारी

पंजाब, यूपीत तिसर्‍या टप्प्यातील प्रचार थांबला, उद्या मतदान

चंदीगड/लखनौ ः वृत्तसंस्था/ हरिओम द्विवेदी :  पंजाबसह उत्तर प्रदेशातील तिसर्‍या टप्प्यात होणार्‍या मतदानासाठीच्या प्रचाराच्या तोफा शुक्रवारी थंडावल्या. रविवारी (ता. 20) पंजाबच्या सर्व 117, तर उत्तर प्रदेशातील तिसर्‍या टप्प्यातील 59 जागांसाठी मतदान होत आहे. दरम्यान, शुक्रवारी प्रचाराच्या अखेरच्या दिवशीच दिग्गज नेत्यांच्या सभा, भाषणे, टीका, आरोप-प्रत्यारोपांनी दोन्ही राज्यांतील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले.

पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेस, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष, शिरोमणी अकाली दल आणि बसपा युती तसेच भाजप आणि माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पंजाब लोक काँग्रेसची आघाडी अशी बहुरंगी लढत होत आहे.

पंजाबसाठी काँग्रेसचा जाहीरनामा

काँग्रेसने शुक्रवारी पंजाबसाठी निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. 13 मुद्द्यांवर जाहीरनाम्यात भर दिला आहे. यात महिलांना प्रतिमहिना अकराशे रुपये आर्थिक साह्यासोबतच 1 लाख नोकर्‍या देण्याचे आश्‍वासन दिले आहे. तसेच वर्षभरात आठ गॅस सिलिंडर मोफत दिले जातील, वाळू उत्खनन आणि मद्यविक्रीसाठी प्राधिकरण निर्माण करून माफियाराजचा खात्मा करू, असेही आश्‍वासन दिले आहे. याशिवाय शेतकर्‍यांकडून तेलबिया, डाळी आणि मका खरेदी करू, असेही जाहीरनाम्यात म्हटले आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शुक्रवारी थांबला. या टप्प्यात 16 जिल्ह्यांतील 59 जागांवर रविवारी (ता. 20) मतदान होणार आहे. तत्पूर्वी, शुक्रवारी दिग्गज नेत्यांनी जोरदार प्रचार केला.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सपाप्रमुख अखिलेश यादव यांनी अनेक विधानसभा मतदारसंघांत प्रचार केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा अलीगडमध्ये होते. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वधेरा यांनी व्हर्च्युअल सभेच्या माध्यमातून 50 मतदारसंघांतील 300 ठिकाणांच्या मतदारांना संबोधित केले. सपामध्ये बंडखोरी करून भाजपमध्ये सामील झालेले मुलायमसिंह यादव यांचे व्याही आणि फिरोजाबादच्या सिरसागंजचे भाजप उमेदवार हरिओम यादव म्हणाले की, अखिलेश यांना दुसर्‍यांदा मुख्यमंत्री बनू देणार नाही.

या टप्प्यात हाथरस, फिरोजाबाद, एटा, कासगंज, मैनपुरी, फर्रुखाबाद, कन्‍नौज, इटावा, औरैया, कानपूर देहात, कानपूरनगर, जालौन, झाशी, ललितपूर, हमीरपूर आणि महोबा या जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे.

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, केंद्रीय मंत्री एसपी सिंह बघेल, योगी सरकारमधील मंत्री सतीश महाना, मंत्री नीलिमा कटियार, मंत्री रामनरेश अग्‍निहोत्री, शिवपाल सिंह यादव आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांची पत्नी लुईस खुर्शीद हे निवडणूक रिंगणात आहेत.

द‍ृष्टिक्षेपात पंजाब निवडणूक

मतदारसंघ – 117
मतदार – 2 कोटी
14 लाखांहून अधिक
उमेदवार – 1,304

द‍ृष्टिक्षेपात तिसरा टप्पा

16 जिल्ह्यांतील
59 मतदारसंघ
2 कोटी 16
लाख मतदार
627 उमदेवार

हेही वाचलंत का? 

कुमार विश्‍वास यांची टिप्पणी हास्यास्पद आहे. मी भगतसिंग यांचा अनुयायी आहे आणि हे मला दहशतवादी ठरवत आहेत. जर मी दहशतवादी असेन तर मी जगातील सर्वात गोड दहशतवादी आहे, जो शाळा आणि रुग्णालये बांधतो.
– अरविंद केजरीवाल

भाजपचा सुपडासाफ करण्याची शेतकर्‍यांनी शपथ घ्यावी. कुटुंब असलेल्या व्यक्‍तीलाच कुटुंबाच्या समस्या कळतात. मुख्यमंत्री बाबाने बुंदेलखंडवासीयांची फसवणूक केली.
– अखिलेश यादव (माधौगड येथील सभेतून)

मी बुलडोझर दुरुस्तीस पाठवला आहे. ज्यांच्यात खूप गर्मी आहे त्यांच्यावर 10 मार्चनंतर बुलडोझर चालवू. 10 मार्चनंतर ते सर्व स्वतःहूनच शांत होतील.
– योगी आदित्यनाथ (करहल येथील सभेतून)

Back to top button