शिर्डी : पुढारी वृत्तसेवा
शिर्डी नगर पंचायतची शिर्डी नगर परिषद व्हावी यासाठी शिर्डी ग्रामस्थांनी होत असलेल्या नगर पंचायत निवडणूकवर बहिष्कार टाकला आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एका माजी नगरसेवकाने उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे शिर्डीत राजकीय हालचालींचा जोर चांगलाच वाढला आहे.
शिर्डीचे माजी नगरसेवक सुरेश काळू आरणे व त्यांच्या पत्नी अनिता आरणे या दोघांनी अर्ज दाखल केले. पहिला अर्ज प्रभाग क्र. १ मधून सर्व साधारण महिला खुला प्रवर्गातून अनिता आरणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर सुरेश आरणे यांनी प्रभाग क्र. ११ मधून अनुसूचित जातीच्या पुरुष प्रवर्गासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. दोघांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केली.
माध्यमांशी बोलतांना सुरेश आरणे म्हणाले की, गावातील विकास कामे न झाल्यावर बहिष्कार केला जात असतो, काही तरी वेगळ्या कारणांसाठी बहिष्कार केला जात आहे. मी पीठासीन अधिकारी यांच्याकडे मला संरक्षण मागितले आहे. उमेदवारी अर्जाची पूर्तता करण्यासाठी निवडणूक शाखेकडे अनामत रक्कम भरत असताना मला काही लोकांनी अरेरावी केली; परंतु मी संविधानाला मानणारा आहे. त्यावेळी मी शांत बसलो होतो. भविष्यात काही अनुचित होऊ नये यासाठी संरक्षणाची मागणी मी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकशाही आणि संविधानाने मला स्वातंत्र्य दिलेले आहे की, कोणीही निवडणूक लढू शकतो, तसा अधिकार आहे. मला अर्ज मागे घ्यायचा असता तर मी अर्ज दाखलच केला नसता, असेही आरणे म्हणाले.
हेही वाचलं का?