तक्रार मागे घेतली नाही म्हणून तिघांनी घरात घुसून लावली आग, ९ घरांचे नुकसान | पुढारी

तक्रार मागे घेतली नाही म्हणून तिघांनी घरात घुसून लावली आग, ९ घरांचे नुकसान

धुळे; पुढारी वृत्तसेवा: भांडणाची तक्रार मागे घेतली नाही, या कारणातून तिघांनी धुळे शहरातील जनता सोसायटीतील घराला आग लावल्याची घटना घडली आहे. या घटनेत ९ घरांमधील संसारुपयोगी साहित्यासह रोकड आगीत भस्‍मसात झाली आहे. याप्रकरणी रुक्साना बानो शेख सलीम या महिलेने चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून जनता सोसायटीमध्ये राहणाऱ्या नदीम काल्या ऊर्फ नदीम रज्जाक शेख, हमीद नाट्या, वसीम रंधा या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस ठाण्यातील फिर्यादीनुसार, ९ घरांमधील संसारुपयोगी साहित्यासह दागिने, शैक्षणिक व इतर महत्त्वाच्या कागदपत्रांसह रोकड जाळून खाक झाला आहे. या आगीत हसीना बी अस्लम खाटीक यांचे संसारोपयोगी साहित्यासह आठ लाख रुपयांचे, कल्लू अन्सारी अब्दुला अन्सारी यांचे दोन लाखांचे, निसार शेख यांचे दहा लाखांचे, मोहम्मद सलीम अब्दुल गफ्फार यांचे दहा लाखांसह रोकड, मोइदोद्दीन गुलाम रसूल खाटीक यांचे आठ लाखांसह २५ हजार रुपयांची राेकड, शाकीराबी आरिफ शहा यांचे सात लाखांसह ७० हजार रोख, रुक्सानाबी यासीन शहा यांचे दहा लाखांसह एक लाखाची रक्कम, आयशाबानो मोहम्मद अन्सारी यांचे पाच लाखांसह वीस हजाराची रोकड, नियाज सय्यद अस्लम यांचे दहा लाखांच्या नुकसानीसह पाच लाखांची रोकड आगीत खाक झाली आहे. तसेच ६ बकऱ्यांदेखील होरपळलेल्या आहेत.

आग लावणाऱ्या तिघांचा फिर्यादी नसीम बानो हिच्याशी मागील भांडणावरून वाद होता. त्यामुळे नसीमने पोलिसांकडे केलेली तक्रार मागे घेतली नाही, म्हणून तिघांनी नसीम बानो हिच्या घरात घुसून पेट्रोल ओतून आग लावली. त्यामुळे सर्व नऊ घरांना आग लागून नुकसान झाले.

जनता सोसायटीतील नदीम काल्या याच्याविरुद्ध चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा मागे घ्यावा, अन्यथा फिर्यादी नसीम बानोचे घर जाळून टाकीन, जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही त्याने रविवारी रात्री दिली होती. त्यानंतर पहाटे आगीची ही घटना घडली.

हेही वाचलंत का? 

Back to top button