

राशीन : पुढारी वृत्तसेवा : शाळेतील मुलीला त्रास देत असल्याची तक्रार दाखल करून घेऊ नका, असे म्हणत पोलिस कर्मचार्याची गचांडी पकडून, दुसर्या पोलिस कर्मचार्यास ढकलून जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार राशीन पोलिस दूरक्षेत्र येथे घडला. यावेळी बाप-लेकाने पोलिसांना शिवीगाळ व दमदाटी केली. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल नितीन धस यांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शाळेतील एक विद्यार्थिनी शाळेत येत-जात असताना एकजण तिला त्रास देत असल्याची तक्रार दाखल करण्यासाठी शिक्षकासमवेत राशीन पोलिस दूरक्षेत्र येथे गेली. त्यावेळी शिक्षकाने मुलीची आई, तसेच त्रास देत असलेला नितीन पप्पू पवार याला बोलावले.
संबंधित बातम्या :
दरम्यान नितीन पवार, त्याचे वडील पप्पू मगर पवार (रा. पवारवाडी, ता. कर्जत) हे तेथे आले. फिर्याद देण्याचे काम सुरू असतानाच या दोघांनी मोठमोठ्याने आरडाओरड केली. दारूच्या नशेत असलेल्या पप्पू पवार व मुलाने विद्यार्थिनी व तिच्या आईस शिवीगाळ केली.
नितीन पवार याने तुम्ही तक्रार दिली तर मी आत्महत्या करेल, अशी धमकी दिली. दरम्यान, पोलिस कर्मचारी त्यांना शांत राहण्याच्या सूचना देत होते. मात्र, त्यांनी ते ऐकून न घेता पोलिसांना तुम्ही तक्रार घ्यायची नाही, असे म्हणत शासकीय गणवेशात असलेल्या पोलिस कॉन्स्टेबल नितीन धस यांची गचांडी धरली. त्यांना सोडविण्यासाठी पोलिस अंमलदार संभाजी वाबळे व पोलिस उपनिरीक्षक अनंत सालगुडे हे पुढे गेले. त्यावेळी नितीन पवार याने वाबळे यांना ढकलून दिले. यामध्ये वाबळे यांच्या डाव्या हाताच्या बोटास दुखापत झाली. त्यानंतर बापलेकांनी आत्महत्या करण्याची धमकी दिली व पोलीस दुरक्षेत्रातून निघून गेले. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.