टोमॅटोचे बाजारभाव पडले; शेतकरी संकटात | पुढारी

टोमॅटोचे बाजारभाव पडले; शेतकरी संकटात

नानगाव : पुढारी वृत्तसेवा :  सध्या टोमॅटोचे बाजारभाव गडगडल्याने उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. ऐन सणासुदीच्या काळात बाजारभाव घसरल्याने आर्थिक गणित कोलमडले असून, यंदाची दिवाळीदेखील कडू होणार असल्याची प्रतिक्रिया शेतकरी बोलून दाखवित आहेत. दौंंड तालुक्यातील भीमा नदीपट्ट्यात व बागायती भागात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर शेतकरी टोमॅटोचे पीक घेत असतात. यावर्षीदेखील शेतकर्‍यांनी लाखो रुपये खर्च करत टोमॅटोच्या बागा तयार केल्या. मात्र, टोमॅटोला सुरुवातीपासून बाजारभाव मिळाला नसल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.

शेतीची मशागत, रोपांची लागवड, लाकूड व तारांचा मंडप, बागांची बांधणी, किटकनाशके, खते, फळांची तोडणी, वाहतूक,
खराब होणारे टोमॅटो, इतर मजुरी यांचा सगळा विचार केला, तर सध्या बागांसाठी खर्च केलेली रक्कमदेखील मिळणार नसल्याचे शेतकरी बोलून दाखवत आहे. सध्या टोमॅटोला 3 ते 5 रुपये किलो असा बाजारभाव मिळत आहे. त्यातच ऑक्टोबर हिटमुळे टोमॅटो मोठ्या प्रमाणावर खराब होत आहे. त्यातच पडलेले बाजारभाव यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे सरकारने शेतीमालाला हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

हेही वाचा :

Back to top button