पाथर्डी : मोहटादेवीच्या दर्शनासाठी गर्दी | पुढारी

पाथर्डी : मोहटादेवीच्या दर्शनासाठी गर्दी

पाथर्डी तालुका; पुढारी वृत्तसेवा : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त श्री क्षेत्र मोहटा देवी गडावर सातव्या माळेची पर्वणी साधत, पाच लाखांवर भाविकांनी दर्शन घेतले. शुक्रवार, शनिवारी मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी नियोजन केल्याने वाहतुकीची कोंडी न होता भाविकांनी मोहटादेवीचे दर्शन घेता आले. पहाटेची आरती आमदार मोनिका राजळे, कृष्णा राजळे यांच्या हस्ते झाली. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी देवीचे दर्शन घेतले. मंदिरासमोर मुख्य दर्शन हॉलमध्ये नऊ रांगा अहोरात्र सुरू होत्या.

त्यामुळे भाविकांना सुलभ आणि काही वेळेत दर्शन मिळाले. शुक्रवारपासून मोहटादेवी गडावर भाविकांची पायी येण्यासाठी गर्दी केली होती. दुचाकी व चार चाकी वाहनांनी पूर्ण रस्ता भरून गेला होता. पोलिसांचे योग्य नियोजन व मुख्ये रस्त्ते चांगले झाल्याने यंदा वाहतुकीची कोंडी झाली नाही. वाहतूक सुरळीत करताना पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना अनेक व्हीआयपी भाविकांच्या आडमुठ्या भूमिकेचा त्रास सहन करावा लागला.

रस्त्यावर अनेक नेते, कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली. रस्त्यात ठिकठिकाणी विविध मंडळांनी व युवा नेत्यांनी भाविकांसाठी स्वागत कमानी उभारल्या होत्या. भाविकांसाठी मोफत फराळ वाटपाचे स्टॉल लावले होते. ढोल-ताशा वाजवित काही मंडळे गडाकडे दर्शनासाठी जात होते. गावोगावच्या पालख्या मिरवत गडावर आल्या.

पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर कायंदे, जगदीश मुलगीर, योगेश राजगुरू, पोलिस उपनिरीक्षक सचिन लिंमकर, श्रीकांत डांगे यांनी चोख बंदोबस्त ठेवला. मोहटादेवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त अ‍ॅड कल्याण बडे, डॉ. श्रीधर देशमुख, शशिकांत दहिफळे, विठ्ठल कुटे, अक्षय गोसावी, अनुराधा केदार, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, कार्यालयीन प्रमुख भीमराव खाडे, संदीप घुले व देवस्थानचे कर्मचारी, पोलिस व महसूल यंत्रणा आदींनी देवी दर्शन व इतर सुविधांसाठी परिश्रम घेत आहे.

मोहटा देवस्थानला राज्याच्या विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने येतात. नवरात्रोत्सवात व्हीआयपी गाभारा दर्शन बंदी केल्याने भाविकांनी स्वागत केले. या निर्णयामुळे दर्शन सुविधा सुरळीत पार पडली.

– सिद्धाराम चालीमठ, जिल्हाधिकारी.

हेही वाचा

लोकप्रतिनिधी मानहानीच्या दाव्याच्या कचाट्यात

Pune School News ; संपर्क केंद्रांची मक्तेदारी संपुष्टात

प्रतीकनगर सोसायटीतील सीमा मराठे पैठणीच्या मानकरी

Back to top button