प्रतीकनगर सोसायटीतील सीमा मराठे पैठणीच्या मानकरी | पुढारी

प्रतीकनगर सोसायटीतील सीमा मराठे पैठणीच्या मानकरी

पौड रोड; पुढारी वृत्तसेवा : महिलांना धकाधकीच्या जीवनातून स्वतःसाठी वेळ काढता यावा, यासाठी नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून दै. ‘पुढारी’, ‘पुढारी न्यूज’, कात्रज दूध संघ आणि स्वामिनी पैठणी यांच्या संयुक्त विद्यमाने पौड रोड येथील प्रतीकनगर सोसायटीत ‘खेळ गृहलक्ष्मींचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अंतिम फेरीत बाजी मारत सीमा मराठे ह्या मानाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या, तर ऋतुजा येनपुरे यांनी उपविजेतेपदाचा मान पटकाविला.
उखाणे घेताना शब्दांची जुळवाजुळव करताना महिलांची उडालेली घांदल… मैत्रिणी व पतीराजाकडे पाहून केलेले स्मित हास्य… समोरच्या गटाला हरविण्यासाठी केलेली धावपळ… ज्येष्ठ महिलांसह गृहिणींनी विविध गाण्यांच्या तालावर धरलेला ठेका… अव्वल क्रमांक मिळविण्यासाठी सर्वांचे सुरू असलेले अटीतटीचे प्रयत्न अन् वेळप्रसंगी हसत-हसत हार पत्करून समोरच्या महिलेच्या विजयाचा साजरा केलेला आनंदोत्सव… अशा खेळीमेळीच्या वातावरणात प्रतीकनगर सोसायटीत ‘खेळ गृहलक्ष्मींचा’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. अंतिम फेरीत बाजी मारत सीमा मराठे यांनी मानाची स्वामिनीची पैठणी जिंकली, तर ऋतुजा येनपुरे ह्या उपविजेत्या ठरल्या.
सोसायटीचे सचिव संभाजी घुंडरे, चेतन रणनवरे, ओंकार घुंडरे, श्रवण पासलकर, निखिल शिंदे, वेदांत जगताप, ऋग्वेद घुंडरे, आर्यन जगताप, सुरज गायकवाड, सोहम नाईक, विघ्नेश येनपुरे, प्रकाश चौधरी, शौर्य मोहोळ, विजय मोरे, रणजित मोरे, अर्जुन शेट्टी यांच्यासह सोसायटीतील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात रंगलेल्या ‘संगीत खुर्ची’ प्रसंगी मानाची पैठणी कोण जिंकणार? याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. महिलांसह सोसायटीमधील बच्चेकंपनी, पुरुष, आबालवृध्द यांनीसुध्दा या खेळाचा आनंद लुटला. ’कात्रज दूध’चे वरिष्ठ व्यवस्थापक कुमार मारणे यांनी या कार्यक्रमाचे रंगतदार सूत्रसंचालन केले.
नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमात सर्वांनी खूप आनंद लुटला. मला पैठणी मिळाली, याचा आनंद झाला आहे.  दै. ‘पुढारी’, ‘पुढारी न्यूज’, कात्रज दूध संघ आणि  स्वामिनी पैठणी यांनी आमच्या सोसायटीत हा कार्यक्रम घेऊन महिलांच्या कलागुणांना वाव दिलाबद्दल आभार.
– सीमा मराठे, 
पैठणीच्या मानकरी
दै. ‘पुढारी’ आणि ‘पुढारी न्यूज’च्या वतीने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे सोसायटीमध्ये हर्षोल्हासाने वातावरण निर्माण झाले होते. यात चिमुकल्यांसह ज्येष्ठांनीदेखील आनंदाने सहभाग नोंदविला. या कार्यक्रमासाठी आमच्या सोसायटीची निवड केल्याबद्दल आभार. ‘पुढारी न्यूज’ चॅनलच्या बातमी आम्ही आवर्जून पाहतो. या चॅनलला व दै. ‘पुढारी’ला  आमच्या  शुभेच्छा.
– संभाजी घुंडरे, 
सचिव, प्रतीकनगर सोसायटी

Back to top button