

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : यंदा दुष्काळाचे सावट जाणवत आहे. अशात चालू गळीत हंगामात कोणता कारखाना उसाला जादा भाव देणार, याची चर्चा सध्या कोपरगावात सुरु आहे. काळे व कोल्हे या दोन मातब्बर नेतृत्वांनी ऊस नसताना गाळप हंगाम यशस्वी करून दाखविले. पाऊस नसल्याने ऑक्टोबर गाळपास उभा ऊस चार्याकडे चालला आहे. यामुळे गाळप क्षमता वाढवुनही आता ऊस कुठून आणायचा, असा प्रश्न उभा ठाकला आहे. सन 2021.22 हंगामात अतिरिक्त पावसामुळे उसाचे गाळप करता- करता नाकी नऊ आले. 2022.23 हंगामात परतीच्या पावसाने ऊस उत्पादन वाढीचे गणित बिघडविले. यामुळे उसाचे जादा क्षेत्र असुनही एकरी उसाचे उत्पादन मिळाले नाही.
संबंधित बातम्या :
उसाचा हंगाम यशस्वी करायचा असेल तर एफआरपीपेक्षा जादा भाव कोण देतो, यावर शेतकरी वर्ग अवलंबुन असतो. त्यामुळे कोपरगाव विधानसभा मतदार संघात काळे – कोल्हे हे नेतृत्व जिल्ह्यात सर्वाधिक ऊस दर देऊन सर्व शेतकर्यांमध्ये चर्चा घडवितात.
यंदा दुष्काळ, कमी पर्जन्यमान, ऊस गाळप क्षमता वाढ अशा पेचात चालू गळीत हंगाम सापडला. अशाच 2024 हे निवडणुकांचे वर्ष असल्याने शेतकर्यांच्या पदरात जादा ऊस दर पडेल, अशी चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. ऊस नसताना हंगाम यशस्वी करण्याचे तंत्र काळे – कोल्हे यांना अवगत आहे. शेजारच्या राहाता तालुक्यात श्रीगणेश कारखान्यात थोरात – कोल्हे यांनी सत्तांतर घडविले. यामुळे गणेशच्या कार्यक्षेत्रातील उसावर आता इतर कारखानदारांना डोळा ठेवणे अवघड आहे.
लोकसभा, विधान सभा, न. पालिका, जि. प., पं. स., ग्रामपंचायत व सोसायट्यांच्या निवडणुकांत मतांची पेटी सांभाळताना साखर सम्राटांची चांगलीच दमछाक होते. साखरेला दुधाची जोड आल्यामुळे पशुधन वाढले. दुग्धोत्पादनात हिरव्या चार्याचे गणित बिघडले. यामुळे उसावर पहिला कोयता चार्याच्या रूपाने पडला. यंदा पाऊस नाही. त्यामुळे विहारी कोरड्या पडल्या. बळीराजाच्या हातून खरीप हंगाम पुर्णतः गेला. परतीचा पाऊस न पडल्यास रब्बी हंगाम देखील हातचा जाणार आहे. अशा बिकट परिस्थितीत दुष्काळात निवडणुका कशा घ्यायच्या हा सर्वांसमोर प्रश्न आहे. यंदाचा ऊस हंगाम अवघा 2 ते 3 महिने चालेल. हंगामी कामगारांना पुढचे 8 ते 9 महिने हाताला कामच मिळणार नाही. त्यामुळे त्यांच्यापुढेही अनेक समस्या निर्माण झाल्या. दिवाळी महिन्यावर आली. हाती खरीप पिके नसल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
उसाला जादा दर दिल्याशिवाय कोंडी फुटणार नाही..!
उसाला जादा दर दिल्याशिवाय चालू गळीत हंगामाची कोंडी फुटणार नाही. बहुतांश शेतकरी सभासदांपुरते क्षेत्राची नोंद करून बाकीचे क्षेत्र मोकळे ठेवतात. जो जादा दर देईल, त्या कारखान्याला हे क्षेत्र देतात. यामुळे स्पर्धा होऊन एकमेकांचे क्षेत्र तुटन हक्काचा ऊस जातो, असे अनेकदा घडले आहे.