Nagar News : भावाशी वाद घातल्याचा राग अन् दिराने केला वहिनीचा खून | पुढारी

Nagar News : भावाशी वाद घातल्याचा राग अन् दिराने केला वहिनीचा खून

साकत : पुढारी वृत्तसेवा :  घरात किराणा सामान आणण्यासाठी पतीने पैसै दिले नाहीत, म्हणून पत्नीने त्याच्या तोंडात मारली. ते पाहून दिराने रागाच्या भरात भावजयीच्या डोक्यात लाकडी ढलपी घालून तिचा खून केला. ही घटना जामखेड तालुक्यातील साकत येथे रविवारी (दि.8) रात्री साडेसात वाजता घडली. या प्रकरणी पतीसह दिराला पोलिसांनी अटक केली आहे. सीमा बाळू घोडेस्वार (वय 35, रा. साकत, ता. जामखेड) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पती बाळू अरूण घोडेस्वार व दीर अतुल अरूण घोडेस्वार अशी आरोपींची नावे आहेत. मयत सीमा हिचे 15 वर्षांपूर्वी आरोपी बाळू घोडेस्वार याच्याशी लग्न झाले होते. ती आपल्या सासरी साकत येथे नांदत होती. त्यांना दीक्षा नावाची 13 वर्षांची मुलगी आहे. सासरी नांदत असताना तिचा पती व दीर सीमाला संसारासाठी व दारू पिण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन येण्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास देत होते.

संबंधित बातम्या :

रविवारी (दि 8) सायंकाळी साडेसात वाजता सीमाचा पती बाळू हा दारू प्यायला होता. घरातील किराणा सामान संपल्याने सीमा व तिची मुलगी दीक्षा या पैसे मागण्यासाठी पती बाळूकडे गेल्या होत्या. मात्र, पैसे देण्यास पतीने नकार देताच, सीमाने पतीच्या तोंडात एक झापड मारली. तसेच, दारू पिऊ नये, म्हणून त्याच्या खिशातील 400 रूपये काढून घेतले. यावेळी सीमाचा दीर अतुल तेथेच होता. भावाच्या तोंडात भावजयीने झापड मारलेली त्याने पाहिली. सीमा घरी आल्यानंतर तिच्या मागे दीर अतुल तेथे आला. भावाच्या तोंडात मारल्याचा राग अनावर झाल्याने त्याने घरातील लाकडी धपली भावजयी सीमाच्या डोक्यात घातली. या घटनेत सीमा गंभीर जखमी झाल्याने तिला जामखेड येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांना सांगितले.

या प्रकरणी मयत सीमाचे वडील राजेंद्र आश्रुबा सरोदे (घुमरा पारगाव, ता. पाटोदा, जि. बीड) यांनी जामखेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी पती बाळू अरूण घोडेस्वार व दीर अतुल अरूण घोडेस्वार यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदविला. पोलिसांनी काही तासांतच कारवाई करीत आरोपींना अटक केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल भारती करीत आहेत.

Back to top button