Nagar News : वडगावपानसह 21 गावांत दहा दिवस निर्जळी ! | पुढारी

Nagar News : वडगावपानसह 21 गावांत दहा दिवस निर्जळी !

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  संगमनेर तालुक्यातील तळेगाव सह 21 गावांना पाणीपुरवठा करणार्‍या तळेगाव प्रादेशिक जीवनधारा पाणी पुरवठा योजनेच्या साठवण तलावात मोठ्या प्रमाणात पाणी शिल्लक आहे. परंतु पाणी योजनेची विद्युत मोटार नादुरुस्त असल्यामुळे गेली 8 ते 10 दिवसापासून या योजनेवर अवलंबून असणार्‍या वडगाव पान इतर 21 गावां मध्ये पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे या योजनेवर अवलंबून असणार्‍या गावातील ग्रामस्थ व महिला चांगल्याच संतप्त झाल्या असून ते आंदोलनाच्या पावित्र्यात उतरले आहे. संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे जीवन प्राधिकरण योजनेच्या अंतर्गत तळेगावसह परिसरातील 21 गावांसाठी तळेगाव प्रादेशिक जीवनधारा पाणीपुरवठा योजना कार्यान्वित्त करण्यात आली आहे. सध्या प्रवरा नदीला पाण्याचे रोटेशन चालू आहे. त्यामुळे या योजनेच्या साठवण तलावात मोठ्या प्रमाणात पाणी शिल्लक आहे. मात्र योजनेची दोन्ही विद्युत मोटारी नादुरुस्त झालेल्या आहेत.

याकडे या योजनेचे अध्यक्ष आणि सचिवांचे अक्षम्य असे दुर्लक्ष होत असल्यामुळे वारंवार या योजनेत काहीतरी बिघाड होऊन या योजनेचा पाणी पुरवठा कायमच खंडित होत असतो. त्यामुळे ही पाणीपुरवठा योजना ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी झाली आहे. त्यामुळे खर्‍या अर्थाने तळेगावसह 21 गावातील नागरिकांचे आणि विशेषता महिला वर्गाचे पाण्यावाचून अतोनात असे हाल होत आहे. त्यामुळे वडगाव पान परिसरातील ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू असणार्‍या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा तसेच तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी 75 कोटी रुपये मंजूर झालेले आहे. मात्र केवळ पाणीपुरवठा योजना समितीचे अध्यक्ष आणि सचिव यांच्याच उदासीनतेमुळे प्रवरा नदीपात्र ते वडगावपान साठवण तलाव नवीन पाईपलाईनचे टाकण्याचे काम सुद्धा अद्याप सुरू झालेले दिसत नाही. त्याचे दुष्परिणाम परिसरा तील 21 गावांना सहन करावे लागत आहे.
तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना समिती अध्यक्ष व सचिवांनी या गंभीर बाबीमध्ये लक्ष घालून सदरची सदरच्या विद्युत मोटारी लवकरात लवकर दुरुस्त कराव्यात आणि या योजनेवर अवलंबून असणार्‍या गावा तील पाणीपुरवठा तात्काळ सुरू करावा, अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशारा वडगावपान ग्रामस्थांस इतरही गावांच्या ग्रामस्थांनी तळेगाव प्रादेशिक जीवनधारा पाणीपुरवठा योजनेच्या पदाधिकार्‍यांना दिला आहे.

पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास जन आंदोलन
संगमनेर तालुक्यातील वडगावपान गावाच्या हद्दीत असणार्‍या तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या साठवण तलावात मोठ्या प्रमाणात पाणी असूनही गेली आठ ते दहा दिवसांपासून विद्युत मोटार नादुस्त झाल्यामुळे पाणीपुरवठा खंडित आहे. त्यामुळेच वडगाव पानच्या ग्रामस्थांवर पाण्यासाठी वण- वण भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तळे गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या अध्यक्ष व सचिवांनी अधिकृत ठेकेदार व प्रतिनिधींची दोन ते तीन दिवसात बैठक बोलवावी. अन बंद असलेला पाणीपुरवठा सुरू करण्याबाबत लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा. अन्यथा वडगाव पान ग्रामस्थ कुठल्याही क्षणी जनआंदोलन उभारतील, असा इशारा वडगावचे सरपंच श्रीनाथ थोरात यांनी दिला आहे.

हेही वाचा :

Back to top button