

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : म्हाळुंगी नदीवरील पुलाचे काम सुरू करावे, या मागणीसाठी आम्ही संगमनेरकर म्हाळुंगी पूल बनावो कृती समितीने परिसरातील नागरिकांना आवाहन करूनसुद्धा कुठलेच घेणे देणेच नाही, असे समजत काही तरुणांचा अपवाद वगळता कोणीही आंदोलनात सहभागी होण्यास फिरकले नाही, मात्र दि. ग. सराफ विद्यालयातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याढ येण्यास दररोज हालापेष्टा सहन कराव्या लागतात, त्यांनी या आंदो लनात सहभाग घेतला. घोषणाबाजी देत विद्यार्थ्यांसह मोर्चा थेट नगरपालिका मुख्याधिकार्यांच्या दालनासमोर धडकला. 'तुम्ही म्हाळुंगी नदीवर पुलाचे काम कधी सुरू करणार ते सांगा,' असा आक्रमक पवित्रा घेत मोर्चेकरांनी मुख्याधिकार्यांना चांगलेच धारेवर धरत घेराओ घातला.
संबंधित बातम्या :
संगमनेरात स्वामी समर्थ मंदिर ते संतोषी माता मंदिरास जोडणार्या रस्त्यावरील म्हाळुंगी नदीच्या मोठ्या पुलाखाली ड्रेनेज लाईनचे काम करताना ठेकेदार व पालिकेच्या तत्कालीन अधिकार्यांच्या हलगर्जीपणामुळे 14 ऑक्टोबर 2022 रोजी म्हाळुंगी नदीचा मोठा पूल खचला होता. त्यामुळे साईनगर पंपिंग स्टेशन व घोडेकर मळा येथील नागरिकांसह दिगंबर गणेश सराफ विद्यालय व ओहरा महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांचे हाल होत होते. या पुलास पर्यायी मार्ग म्हणून पालिका प्रशासनाने खचलेल्या पुलाजवळ लोखंडी छोटा पूल करून रस्ता तयार केला होता, परंतु या रस्त्याचा वाहतुकीस उपयोग होत नव्हता. यामुळे त्याचा उपयोग झाला नाही. नवीन पुलासाठी शासनाने साडेचार कोटी रुपये जून महिन्यात मंजूर केले, मात्र निधी मंजूर होऊन चार महिने उलटले तरी नवीन पुलाचे काम सुरू होत नाही. या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांसह विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले.
काही तरुणांनी एकत्र येत आम्ही संगमनेरकर म्हाळुंगी पूल बनाव कृती समिती स्थापन केली. प्रांताधिकारी, तहसीलदार पोलिस निरीक्षक व पालिका मुख्याधिकार्यांना निवेदन देण्यासाठी बैठक घेतली. या समितीने परिसरातील नागरिकांना आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले, मात्र या नागरिक व महिला कुठलेच गांभीर्य लक्षात न घेता आंदोलनाकडे फिरकले नाहीत. समितीने दि गसराफ विद्यालयाचे विद्यार्थ्यांना अहवाल केल्यानंतर विद्यालय प्रशासनाने या आवाहनाला प्रतिसाद दिला. विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाल्या.
श्रीस्वामी समर्थ मंदिरापासून मोर्चास सुरुवात झाली. मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी, म्हाळुंगी नदीवरील पूल झालाच पाहिजे, बघता काय सामील व्हा, अशा घोषणांनी नगरपालिकेचा परिसर दुमदुमून टाकला. जोरदार घोषणाबाजी करीत आलेला मोर्चा थेट मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या दालनासमोर धडकला. वर्ष उलटले तरी म्हाळुंगी नदीच्या खचलेल्या पुलाचे काम सुरू का होत नाही, असा संतप्त सवाल आंदोलकांनी मुख्याधिकारी वाघ यांना विचारला. या पुलाचे काम कधी सुरू करणार, याचे लेखी उत्तर द्या, अन्यथा आम्ही म्हाळुंगी पूल खचलेल्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे 14 ऑक्टोबर रोजी तुमच्या दालनासमोर पुलाचे वर्ष श्राद्ध घालू, असे संतप्त झालेल्या आंदोलकांनी सांगत मुख्याधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले.
फुलाचे काम तुम्ही कधी सुरू करणार, यासंदर्भात लेखी निवेदन दिल्याशिवाय येथून हलणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला. संध्याकाळपर्यंत लेखी देतो, असे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले. नंतर कृती समितीने प्रांताधिकारी, तहसीलदार व पोलिसांना निवेदन दिले.
म्हाळुंगी नदीवर नवीन पुल बनविण्या संदर्भात सर्व तांत्रिक बाबींचे परीक्षण संगमनेर पालिकेने केले आहे. त्याचे ऑडिट झाले आहे. पुलाचे सार्वजनिक बांधकाम विभागाने नकाशे व आराखडा मंजूर केला. त्यानुसार अंदाजपत्रक सादर केले. प्रथमतः या पुलाला 4 कोटी 50 लाख रुपये खर्च होणार होता, परंतु सर्व बाबी तपासल्यानंतर आता 5 कोटी 76 लाख रुपये खर्च लागणार आहे. दीर्घकालीन प्रक्रिया असल्याने ही सर्व कामे पूर्ण करण्यास साधारणतः 2 महिने लागू शकतात.
– राहुल वाघ, मुख्याधिकारी संगमनेर नगर परिषद