Pune News : माकडांच्या हल्ल्यात रायरी येथे मोठे नुकसान | पुढारी

Pune News : माकडांच्या हल्ल्यात रायरी येथे मोठे नुकसान

भोर : पुढारी वृत्तसेवा : रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या रायरी येथे माकडांच्या सुमारे 40 ते 50 जणांच्या टोळक्याने भात, नाचणी, भुईमूग, आंबा, फणस, तसेच इतर झाडांची नासधूस केली. यासह घरावर चढून कौले, पत्रे, खिडक्या आणि दरवाजाचे नुकसान केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी वनविभागाकडे
केली आहे. रायरेश्वर गडाच्या पायथ्याला असलेल्या रायरी गावठाण, फणसवाडी, रेणुसेवाडी, धारांबेवाडी येथे मागील 10 ते 15 दिवसांपासून 10 ते 15 माकडे अशा दोन ते तीन टोळ्या येतात. सुमारे 40 ते 50 माकडे असून, भाताच्या बाहेर पडलेल्या ओंब्या तोडणे, भुईमूग उपटणे, नाचणी, वरई आदींची मोडतोड करणे, आंबा, फणस, तसेच इतर महत्त्वाच्या फळझाडांच्या फांद्या तोडणे, घरावर चढून कौल फोडणे, पत्रे चिंबवणे आणि खिडक्या, तसेच दरवाजावर मारणे, घरात जाऊन कांदे, खाद्य पदार्थ पळवणे असे उपद्व्याप ही माकडे करीत आहेत.

या माकडांना विरोध केल्यास ती नागरिकांच्या अंगावर धावून जातात. हा प्रकार मागील 10 ते 15 दिवसांपासून सुरू आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, घराबाहेर पडण्यास किंवा शेतात जाण्यास ते भीत आहेत. त्यामुळे वनविभागाने या माकडांचा बंदोबस्त करून लोकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिक करीत आहेत. दरम्यान, नुकसान झालेल्या शेतकर्‍यांनी वनविभागाकडे अर्ज करावा. त्याचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात येईल, असे वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी राऊत
यांनी सांगितले.

यापूर्वी कधीच माकडे येत नव्हती
यापूर्वी कोणत्याही प्रकारची गावठी किंवा जंगली माकडे गावात कधीच येत नव्हती. मात्र, ही माकडे जंगलातून आले आहेत का कोणत्याही शहरातील माकडे आणून सोडली आहेत, याबाबत गावात चर्चा सुरू आहे. कित्येक वर्षात अशाप्रकारे माकडांनी गावठाणात येऊन धुमाकूळ घातलेला नव्हता, असे वयोवृद्ध नागरिक सांगत आहेत. त्यामुळे वनविभागाने ही माकडे पकडून घेऊन जावे आणी नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

हेही वाचा : 

Back to top button