Pune News : पुरंदर विमानतळाचा प्रश्न ग्रा.पं.त गाजणार | पुढारी

Pune News : पुरंदर विमानतळाचा प्रश्न ग्रा.पं.त गाजणार

अमृत भांडवलकर

सासवड: पुरंदर तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्या आहेत, त्यामध्ये ज्या गावात आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित आहे त्या गावाचा समावेश असल्याने या निवडणुकीत विमानतळाचा मुद्दा गाजणार आहे. पुरंदर तालुक्यातील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित गावातील वनपुरी, उदाचीवाडी, एखतपूर-मुंजवडी या ग्रामपंचायतींच्या निवडणुका लक्षवेधी ठरणार आहेत. वनपुरीत, उदाचीवाडी येथे राष्ट्रवादी, तर एखतपूर-मुंजवडी येथे शिवसेना मित्रपक्षांची सत्ता आहे. विमानतळाचा विषय सध्या या भागातील जिव्हाळ्याचा असल्याने या ग्रामपंचायतींमध्ये काय निकाल लागतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

या निवडणुकीत माजी राज्यमंत्री, आमदार विविध पक्षांचे नेते आमनेसामने भिडणार आहेत. यात आमदार संजय जगताप, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ.दिगंबर दुर्गाडे, राष्ट्रवादीचे संभाजी झेंडे, भाजपचे बाबाराजे जाधवराव हे पूर्ण ताकतीने आपल्या विचारांच्या ग्रामपंचायती निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. साधारण एक महिनाभर राजकीय वातावरण तापणार असून, निवडणूक असलेल्या गावात चांगलाच कलगीतुरा पाहायला मिळणार आहे. सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने राजकीय गट निवडणुका प्रतिष्ठा पणाला लावून लढणार आहेत. ही निवडणूक प्रत्यक्षात पक्षाच्या चिन्हावर लढविली जाणार नसली, तरी प्रत्येक राजकीय पक्ष आपलीच सत्ता यावी म्हणून प्रयत्नशील असतात.

गुळुंचे, माळशिरस, वीर, वाल्हे या मोठ्या गावांच्या निवडणुका लक्षवेधी ठरणार आहेत. गुळूंचे ग्रामपंचायतीवर माजी सभापती अजित निगडे व सुरेश जगताप यांची सलग दोन पंचवार्षिक असलेली राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता उलथून सर्व पक्षीयांंनी सत्ता प्रस्थापित केली होती. यावर्षी सरपंचपद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असून, थेट जनतेतून सरपंचपदाची निवडणूक होणार आहे. दोन्ही गटांतील राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, भाजपचे कार्यकर्ते विभागून ग्रामपंचायतीत ’एन्ट्री’ करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली आहे. संपूर्ण पुरंदर तालुक्याचे गुळूंचे ग्रामपंचायतीकडे लागले आहे.

वाल्हे ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन सुकलवाडी, अडाचीवाडी, वागदरवाडी व अडाचीवाडीची निर्मिती झाली. याठिकाणी राष्ट्रवादी, शिवसेनेकडे प्रत्येकी दोन ग्रामपंचायती आहेत. या चार ग्रामपंचायतींत जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ, दिगंबर दुर्गाडे व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा कस लागणार आहे. वीर ग्रामपंचायतीचे गेल्या पंचवार्षिकला ज्ञानेश्वर (माऊली) वचकल हे काँग्रेसचे सरपंच म्हणून लोकनियुक्त त्याचप्रमाणे राष्ट्रवादीमधून लालासाहेब धुमाळ यांचा थोड्याच फरकाने पराभव झाला होता, तर शिवसेनेचे संतोष धुमाळ तिसऱ्या नंबरवर होते आणि भाजपचे मधुकर धसाडे हे चवथ्या क्रमांकावर, तर शिवसेनेचे बंडखोर बाळासाहेब समगीर हे पाचव्या नंबरवर होते.परंतु, या वर्षी चित्र वेगळे असू शकते. शिवसेनेचे दोन गट आणि राष्ट्रवादीचे दोन गट यामुळे तिसरा बाजी मारू शकतो.

माळशिरसचा बालेकिल्ला कोणते ‘सर’ सर करणार ?
राष्ट्रवादीचे अरुण (सर) यादव यांची अनेक वर्षांची एकहाती सत्ता नव्याने माळशिरसच्या राजकारणात उतरलेले काँग्रेसचे महादेव बोरावके (सर) यांनी पहिल्याच प्रयत्नात आपल्या हाती घेतली. महादेव बोरवके (सर) पहिल्याच प्रयत्नात थेट जनतेतून माळशिरसचे सरपंच झाले. माळशिरस ग्रामपंचायतीचा निवडणूक आखाडा आता तापू लागला आहे. आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर सोबत राहून काटा काढायचा असेच राजकारण या ठिकाणी दिसून आले आहे. या वेळी दोन्ही ’सर’ एकमेकांच्या विरोधात दंड थोपटणार की सोबत राहून नवख्यांचा काटा काढणार हे निकालानंतर दिसून येईल. दरम्यान, दोन्ही ’सर’ समोरासमोर लढल्यास कोणते ’सर’ माळशिरस ग्रामपंचायतीचा गड सर करणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

Back to top button