Nagar news : नगर तालुक्यात अतिवृष्टी ; साडेतीन महिन्यांत सरासरी फक्त 230.1 मि.मी. पावसाची नोंद

Nagar news : नगर तालुक्यात अतिवृष्टी ; साडेतीन महिन्यांत सरासरी फक्त 230.1 मि.मी. पावसाची नोंद

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी पावसाने नगर शहर आणि तालुक्याला चांगलेच झोडपून काढले. या तालुक्यात 114.9 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 37.9 मि.मी. पाऊस झाला. गुरुवार, शुक्रवार व शनिवार या तीन दिवसांत जिल्ह्यात तब्बल 107.5 मि.मी. पाऊस झाला. त्यामुळे तीन दिवसांत 24 टक्के पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात एक दोन नक्षत्रे वगळता सर्वच नक्षत्रे कोरडेठाक गेली. साडेतीन महिन्यांत 21 सप्टेंबरपर्यंत सरासरी फक्त 230.1 मि.मी. पावसाची नोंद झाली. 51 टक्के पाऊस होऊनही कोठे ओढे, नाले वाहिले नाहीत.

त्यामुळे गावागावांतील छोटे-मोठे तलाव कोरडेठाक पडले. काही तालुक्यांत काही दिवसांपुरताच चारा शिल्लक असल्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला. दमदार पावसाअभावी टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढू लागताच टँकरची मागणीदेखील वाढली. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती गडद झाली. शासनाच्या आदेशानुसार दुष्काळी उपाययोजनांसाठी जिल्हा प्रशासनाची धावपळ सुरू झाली.

संबंधित बातम्या :

अशा परिस्थितीत उत्तरा नक्षत्राने जाता जाता गुरुवारी जिल्ह्यात सर्वदूर दमदार हजेरी लावली. तब्बल 38.4 मि.मी. पावसाची नोंद झाली. शुक्रवारी देखील जिल्ह्यातील पारनेर, नगर, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता व पाथडीं तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. या दिवशी सरासरी 30.5 मि.मी. पावसाची नोंद झाली. तिसर्‍या दिवशी शनिवारीदेखील पावसाचा जोर कायम होता. नगर शहर आणि तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. नगर तालुक्यातील सर्वच अकरा महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. या मुसळधार पावसाने नगर शहर आणि तालुक्यात पाणीच पाणी झाले.

याशिवाय जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, अकोले व संगमनेर तालुक्यांतदेखील दमदार पावसाची नोंद झाली आहे. उत्तरा नक्षत्रात पडलेल्या या दमदार पावसाने दुष्काळी परिस्थितीची तीव्रता काही प्रमाणात कमी केली आहे. या पावसामुळे चारा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तीन दिवसांत झालेल्या पावसामुळे पावसाची सरासरी आता 337.6 मि.मी. वर पोहोचली असून, टक्केवारी 75.3 पर्यंत पोहोचली आहे. गेल्या वर्षी हीच टक्केवारी 121 इतकी होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news