पुणे : वाहन उद्योग क्षेत्रात देशात पहिल्या क्रमांकाचे शहर म्हणून आणण्यासाठी वाहतूक सेवा प्रदूषणमुक्त इंधन प्रणालीचा वापर करून सक्रिय करणे गरजेचे आहे. याच विचारातून कचर्यातून हायड्रोजन निर्मिती करण्याचा प्रकल्प केंद्राच्या माध्यमातून पुण्यातील हडपसर परिसरात उभा केला जात आहे. यातून निर्मित होणारे इंधन आणि विजेचा वापर करून पुण्यातील सार्वजनिक वाहतूक सेवा लवकरच सुरू करण्याची तयारी केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने चालवली असून, काम अंतिम टप्प्यात आहे. देशातील सार्वजनिक वाहतूक सेवा लवकरच विजेवर चालणार्या वाहनांच्या माध्यमातून देण्याच्या दृष्टीने धोरण आखले जात आहे.
संबंधित बातम्या :
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रदूषणमुक्त इंधन प्रणाली आत्मसात केल्यास पुण्यातील वाहन उद्योग देशातील पहिल्या क्रमांकाचे औद्योगिक शहर म्हणून नावरूपास येऊ शकते, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच पुण्यातील एका कार्यक्रमात व्यक्त केले होते. पुण्यात झालेल्या 'कमर्शियल व्हेईकल फोरम' कार्यक्रमात गडकरी यांनी त्यांच्या विभागाकडून सुरू असलेल्या प्रकल्पाच्या कामाची माहिती दिली होती. कराच्या माध्यमातून सर्वाधिक महसूल देणारा त्याचबरोबर सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा वाहन निर्मिती हा उद्योग पुण्यात आहे. देशात तयार होणार्या वाहनांपैकी 50 टक्के वाहनांची निर्यात याच शहरातून होते आणि अनेक उद्योगांना लागणारे साहित्य येथूनच पुरवले जाते. वाढत्या शहरीकरणाबरोबर वाढते प्रदूषण ही समस्या गंभीर रूप धारण करत होती. पुणेकरांच्या या गंभीर विषयावर केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने मागील काही महिन्यांपासून काम सुरू केले असून, 'प्रदूषणमुक्त पुणे' अशी ओळख मिळवून देण्यासाठी पर्यायी इंधनावर सार्वजनिक वाहने कशी यशस्वीपणे चालतील यावर अभ्यास सुरू आहे.
जैविक इंधनावर भर…
कचरा प्रश्न सर्वच शहरांचा गंभीर प्रश्न असला, तरी केंद्राचा हा विभाग कचर्याचा वापर करून जागतिक दर्जाचे रस्ते तयार करत आहे. याशिवाय कचर्यापासून इंधन निर्मिती करून त्यावर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभी करण्याचे काम करत आहे. जैविक इंधनचा वापर लक्षात घेता पुण्यातच जैविक इंधन बनवण्याचे उद्योग उभे राहत आहेत. शिवाय फ्लेक्स इंजिन निर्मितीच्या क्षेत्रात देखील भारताने चांगली प्रगती केली आहे; मात्र त्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली, तर हा उद्योग लवकरच देशातील पहिल्या क्रमांकाचा उद्योग बनवण्याचा हा विभाग प्रयत्न करत आहे.