राज्यातील तरुण डायबेटिसच्या विळख्यात | पुढारी

राज्यातील तरुण डायबेटिसच्या विळख्यात

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  मधुमेहाविरूद्धच्या लढाईत लक्षणे कमी असल्याने निदान होत नसल्याचे मोठे आव्हान असल्याची आकडेवारी समोर आली आहे. राज्यातील तरूणांची मधुमेह तपासणी केल्यावर १०० पैकी ४८ जणांना मधुमेहाचे निदानच न झाल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

ऑगस्ट अखेरपर्यंत राज्यभरातील ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या २२ लाख लोकांची मधुमेह तपासणी करण्यात आली. यातील १० लाख ९ हजार तरूणांना मधुमेहाचे निदान झाले. तर ३२ लाख ४७ हजार लोकांच्या तपासणीअंती त्यापैकी २३ लाख लोकांना हायब्लडप्रेशरचा त्रास असल्याचे निदान झाले. त्यापैकी ५ लाख लोकांना सहव्याधी आहेत.

दरम्यान, निदानास उशीर झाल्यामुळे, विशेषतः टाइप २ मधुमेह, दीर्घकालीन चयापचय विकार, इन्सुलिन प्रतिरोधकता व उच्च रक्तातील साखरेची पातळी, जीवनशैलीच्या घटकांशी संबंधित रोगनिदान उशिरा झाल्याने बऱ्याच रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागते. राज्यातील मधुमेहाच्या १० पैकी सात रुग्णांना ‘डायबेटिस फूट’ झाला असल्याचे केईएम रुग्णालयातील एंडोक्राइनोलॉजीचे प्रमुख डॉ. तुषार बंडगर यांनी सांगितले. तरूणपिढी औषधोपचार व पथ्यांचे पालन करीत नाही. अनेक राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही तांदळाचा वापर भरपूर होतो. कार्बोहायड्रेडचे प्रमाण अधिक असलेले भात, बिर्याणी, पुलाव, पोहे व वडापाव यासारखे पदार्थ खाण्याचा परिणाम मधुमेह होण्यावर होतो. रस्त्यावरील खाद्यपदार्थांतही भाताचा वापर होतो. मधुमेह व उच्चरक्तदाबाचे प्रमाण वाढण्यामागे बैठी जीवनशैली व आहारातील खाण्याच्या सवयी कारण असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे

साखरयुक्त, प्रक्रिया केलेले, कार्बोहायड्रेडयुक्त अन्नपदार्थांच्या अतिसेवनामुळे मधुमेह होऊ शकतो. या खाद्यपदार्थामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. ग्लुकोजचे नियंत्रण नसल्यामुळे टाइप २ मधुमेहाचा धोका वाढवतो.
डॉ. राजीव कोविल, संस्थापक, युनायटेड डायबिटीज फोरम (UDF)

मधुमेहाची लक्षणे दिसायला वेळ लागू शकतो. विशेषतः टाइप २ मधुमेह झालेल्यांत सहसा निदान होत नाही. कारण अशा लोकांत सुरुवातीची लक्षणे सूक्ष्म किंवा लक्षात न येणारी असू शकतात. याशिवाय काही अन्य कारणांमुळे त्रास होत असल्याचे समजून याकडे दुर्लक्ष करतात.
– डॉ. चारुदत्त शिंदे सिव्हिल सर्जन, नंदुरबार

Back to top button