शिर्डी(अहमदनगर) : अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. राहाता तालुक्यातील सावळीविहीर वाडी येथे काल मध्यरात्री मोठे तिहेरी हत्याकांड घडले आहे. शुल्लक कारणावरून जावयाने धारदार शस्त्राने वार करत पत्नी, मेहुणा आणि सासूचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्य झाला असून सासरे आणि मेहुणी गंभीर जखमी झाले आहे. सुरेश निकम असे आरोपी जावयाचे नाव असून पत्नी वर्षा सुरेश निकम (वय 24 वर्षे), मेहुणा रोहित चांगदेव गायकवाड (25 वर्षे) आजे सासू हिराबाई द्रौपद गायकवाड (70 वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने अहमदनगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
संबंधित बातम्या :
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, राहता तालुक्यातील सावळीविहिर वाडी येथे पत्नी माहेरी राहत होती. यामुळे पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असल्याची माहिती आहे. याच कारणावरून सुरेश निकम यांचा पत्नीसोबत आणि तिच्या माहेरच्या लोकांसोबत अनेक वर्षांपासून सतत वाद सुरु होते. या वादातूनच हा हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
दरम्यान काल मध्यरात्रीच्या सुमारास जावई पत्नीच्या घरी गेला, आणि सासरच्या लोकांवर अचानक धारदार शस्त्राने हल्ला केला. या घटनेत पत्नी, मेहुणा आणि सासूचा जागीच मृत्यू झाला. तर जावयाच्या हल्ल्यात सासरा आणि मेहुणी मध्यस्थी करत असताना दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना शिर्डी येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. घटनास्थळी शिर्डीचे पोलीस उपनिरीक्षक संभाजी पाटील दाखल झाले असून अधिक तपास पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके आणि पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
हेही वाचा