Ganeshotsav 2023 : ‘बाप्पा’च्या स्वागताला नगरकर सज्ज | पुढारी

Ganeshotsav 2023 : ‘बाप्पा’च्या स्वागताला नगरकर सज्ज

नगर : पुढारी वृत्तसेवा :  संकटांचं निवारण करणारी देवता म्हणून लौकिक असलेल्या आणि पूजेचा पहिला मान असलेल्या विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनासाठी नगरकर सज्ज झाले आहेत. गणरायाची प्राणप्रतिष्ठा मंगळवारी (दि. 19) होणार असून, घरोघरी बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. बाजारपेठेत आकर्षक मखर, विद्युत रोषणाई साहित्य खरेदीसाठी भक्तांची काही दिवसांपासून गर्दी दिसत आहे. गणेशमूर्तींसह सजावटीच्या विविध साहित्याचे आणि पूजा साहित्याचे स्टॉलही रस्तोरस्ती आणि चौकाचौकात सजले आहेत. एकंदरीतच बाप्पाच्या आगमनाआधीच बाजारपेठेत नवचैतन्य निर्माण झाले असून, या मुहूर्तावर कोट्यवधींची उलाढाल होण्याची शक्यता व्यापारी वर्गाने वर्तविली आहे. त्यामुळे बाप्पांच्या मुक्कामाचे दहाही दिवस चैतन्याने, आनंदाने भारलेले असतील यात शंका नाही.

संबंधित बातम्या : 

शहरातील चितळे रस्ता, दिल्ली गेट, माळीवाडा यांसह सावेडीतील प्रोफेसर कॉलनी चौक, पाईपलाईन रस्ता अशा विविध ठिकाणी खरेदीसाठी नगरकरांची गर्दी दिसत आहे. गणेशोत्सव काळात लागणार्‍या साहित्याची खेरीदी गणेशभक्तांकडून केली जात आहे. पूजेचे साहित्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू यासह फळे, फुले आदींना मोठी मागणी बाजारात आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नागरिक नवीन दुचाकी, चारचाकी वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करीत असतात. त्यामुळे शहरातील सर्वच व्यवसायांना बाप्पाच्या आगमनामुळे झळाळी मिळाली आहे. त्यासोबतच शहरात मूर्ती कारखान्यांची संख्या मोठी आहे. नगरच्या मूर्ती परराज्यातही पाठविल्या जातात.
आता दोन दिवसांवर गणेशोत्सव आल्याने व रविवारी सुटी असल्याने नगरकरांनी बाजारात मूर्तींच्या खरेदीसाठी गर्दी केली होती. यंदाचा गणेशोत्सव दिमाखात साजरा होणार असून, महापालिका, पोलिस प्रशासनाकडूनही नियोजन करण्यात येत आहे.

पूजेच्या साहित्याची दुकाने सजली
गुरुवारी गौरींचे आगमन होणार आहे. त्यामुळे पूजेच्या साहित्याची दुकाने सजली आहेत. कापूर, कंठी, अगरबत्ती, धूप, लाकडी पाठ, समई, निरंजन, पितळेचे ताठ, हळद, कुंकू, अबीर, गुलाल, रांगोळी या साहित्याची खरेदी सुरू आहे. अगरबत्तीचे 50 रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत भाव आहेत. तर, धूप 350 रुपये किलोप्रमाणे विक्रीसाठी आहे.

एलईडी घुमट अन् दिव्यांची रोषणाई
बाप्पाच्या मखराभोवती रोषणाईसाठी कृत्रिम दिवे लावले जातात. एलईडी घुमट, डान्सिंग बल्ब, एलईडी फोकसची खरेदी सुरू आहे. आर्टिफिशिअल तोरण 120 ते 600 रुपये, फुलांच्या माळा 20 ते 400 रुपये याप्रमाणे विक्रीसाठी बाजारात आहेत. झेंडूची फुले 120 रुपये किलोप्रमाणे विकली जात आहेत. शेवंती 120 ते 150 रुपये किलो, तुळजापुरी फुले 70 रुपये किलो, गुलाब 5 ते दहा रुपये प्रति नग, निशिगंधा 320 ते 800 रुपये किलो व गजरा फुले 650 रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहेत.

ऑटोमोबाईल सेक्टरचा बोलबाला!
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गणेशभक्तांकडून दुचाकी वाहने खरेदी करण्याला पसंती मिळत असून, नगरकरांनी शहरातील शोरूममध्ये दुचाकींची बुकिंग केली आहे. सक्कर चौकातील भन्साली शोरूममध्ये 60 दुचाकींची बुकिंग झालेली आहे. तसेच, इलेक्ट्रानिक वाहने खरेदीकडेही नगरकरांचा कल वाढला असून, तब्बल 50 ई-वाहनांची बुकिंग झाल्याचे अभिनंदन भन्साली यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

हेही वाचा :

Back to top button